लोकअदालत: राज्यात सर्वाधिक दावे नाशकात निकाली; वीस कोटींची वसूली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 09:27 PM2018-02-10T21:27:07+5:302018-02-10T21:33:22+5:30
नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्ट्रीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. या अदालतीमध्ये सर्वाधिक ४६ हजार १३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याने सलग तिस-यांदा नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले. एकूण वीस कोटी ५२ लाख ४० हजार ८१४ रुपयांची विक्रमी वसुली पूर्व व प्रलंबित प्रकरणांमधून करण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हाभरातून प्रलंबित प्रकरणांपैकी ७ हजार ९९८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १ हजार ९८९ प्रकरणे निकाली काढली गेली. तसेच एक लाख ८३ हजार २३ दावा पूर्व प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती, त्यापैकी ४४ हजार १५० प्रकरणांचा निपटारा झाला. एकूण ४६ हजार १३९ प्रकरणे निकाली निघाली. दावादालत प्रकरणांमध्ये एकूण रक्कम दहा कोटी ९८ लाख ४८ हजार १६३ रुपये इतकी वसूल झाली. यामध्ये मोटार अपघात प्रकरणांमध्ये सुमारे ३ कोटी ९३ लाख ९१ हजार ३२५ तर धनादेश न वटल्याप्रकरणी ४ कोटी ४२ लाख ५५ हजार २० रुपयांचा दंड व नुकसानभरपाईची रक्कम वसूल करण्यात आली. लोकन्यायालयापुढे आलेल्या ४ हजार ६३७ फौजदारी गुन्ह्यांपैकी ११८ प्रकरणांचा निपटारा होऊन ६ लाख ९५ हजार ५५० रुपयांच्या दंडाची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. वाहतुकीसंदर्भात एकूण ८ हजार ४६१ दावे निकाली काढण्यात येऊन १६ लाख ७३ हजार ८०० रुपयांची दंडाची रक्कम वसूल केली गेली. बॅँकेच्या वसुली प्रकरणांशी संबंधित एक हजार २१९ पूर्व दावे दाखल होऊन २४८ दावे निकाली निघाले व १ कोटी ७५लाख ३९ हजार ८०७ रुपयांची तडजोडीची रक्कम वसूल झाली तसेच बॅँक वसुलीच्या ५५ प्रलंबित दाव्यांपैकी १० दावे निकाली निघाले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीरकुमार बुक्के यांनी दिली.