नाशिक महापालिकेच्या पाय-यांवर होणा-या आंदोलनांमुळे नागरिकांना प्रवेश अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:40 PM2018-01-02T15:40:23+5:302018-01-02T15:44:52+5:30
सुरक्षा रक्षकांची बघ्याची भूमिका : दीड कोटी रुपये खर्चून ४५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक
नाशिक - महापालिकेत वार्षिक दीड कोटी रुपये खर्चून शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली परंतु, या सुरक्षारक्षकांच्या तैनातीनंतरही महापालिकेच्याराजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारावरील पाय-यांवर आंदोलक धडक मारत असल्याने विविध कामकाजासाठी येणा-या नागरिकांना मुख्यालयात प्रवेश करणे अवघड बनत आहे. वाट बंद करून टाकणा-या या आंदोलकांना आवरण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने आंदोलकांचेही फावते आहे.
महापालिका मुख्यालयात राजीव गांधी भवनमध्ये महाराष्ट सुरक्षारक्षक मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. एकूण ४५ सुरक्षारक्षकांपैकी २९ सुरक्षारक्षकांची नेमणूक राजीव गांधी भवनमध्ये करण्यात आलेली आहे. राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासह आतील प्रवेशद्वारावरही हे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. दरम्यान, महापालिकेवर विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष-संघटनांचे मोर्चे येत असतात तर काही संघटनांकडून पालिकेसमोर धरणे, निदर्शने तसेच ठिय्या आंदोलने केली जात असतात. महापालिका मुख्यालयावर येणारे मोर्चे हे बाहेरील प्रवेशद्वारावरच अडवले जातात आणि त्यातील निवडक आंदोलकांना आतमध्ये निवेदने देण्याकरीता प्रवेश दिला जातो. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून काही आंदोलकांकडून आतील प्रवेशद्वारावर धडक मारत पाय-यांवर बसून निदर्शने केली जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे विविध कामकाजानिमित्त महापालिका मुख्यालयात येणा-या नागरिकांची वाट अडवली जाते आणि त्यांना पूर्व दरवाजाने पाठविले जाते. ब-याचदा नागरिकांना वाट काढणे मुश्किल बनते. मंगळवारी (दि.२) गंजमाळवरील श्रमिकनगर मधील पाच ते सात आंदोलकांनी घरकुलाच्या मागण्यांसाठी पाय-यांवर ठिय्या मांडला आणि घोषणाबाजी सुरू केली. सदर आंदोलकांना रस्त्यातून बाजूला करण्याचे काम सुरक्षा रक्षकांकडून होणे अपेक्षित होते अथवा त्यातील पाच जणांना आतमध्ये निवेदन देण्यासाठी पाठवून देत आंदोलनाची इतिश्री करणे सोपे होते. परंतु, सुरक्षारक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने मुख्यालयात ये-जा करणा-या नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. सदर आंदोलकांनी पाय-यांवर बसून वाट अडवल्याने त्या काळात आलेल्या दोघा अपंग बांधवांना वाट काढणे मुश्किल बनले होते. महापालिकेने एकीकडे अपंग बांधवांसाठी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर व्हीलचेअर उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला आहे परंतु, प्रत्यक्षात व्हीलचेअर मात्र दिसून येत नाही. महापालिकेवर होणा-या विविध आंदोलनांप्रसंगी सामान्य नागरिकांना मुख्यालयात प्रवेश करताना अडचणी येणार नाहीत, अशा प्रकारचे नियोजन होण्याची गरज असल्याची भावना यावेळी काही नागरिकांनी बोलून दाखविली.
श्रमिकनगर रहिवाशांची निदर्शने
श्रमिकनगर येथील झोपडपट्टी स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांना चुंचाळे येथील घरकुल योजनेत सामावून घेतले जाणार आहे. परंतु, रहिवाशांना जवळपासच घरकुल देण्याच्या मागणीसाठी श्रमिकनगर रहिवाशी संघाच्यावतीने दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना आयुक्तांची भेट नाकारल्याने आंदोलकांनी पाय-यांवर ठिय्या मांडून निषेध नोंदविला.