सिडको परिसरात डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:28 AM2018-09-26T00:28:18+5:302018-09-26T00:29:05+5:30
नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता.
सिडको : नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता. यामुळे सिडको प्रभागात लोकप्रतिनिधी, महापालिका यांच्या वतीने प्रभागनिहाय जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदरची मोहीम नुकतीच प्रभाग क्रमांक २५ व २८ मध्ये राबविण्यात आली. सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून साथरोग आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडको भागात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा आरोप प्रभाग सभेत सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असून, मनपा कर्मचाऱ्यांकडून प्रभागनिहाय स्वच्छता तसेच धूर व औषध फवारणी करून नागरिकांना प्रबोधन करण्यात येत आहे. सिडको प्रभाग २५ मध्ये सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, राकेश ढोमसे तसेच मनपाचे नदीम पठाण आदी सहभागी झाले होते. नागरिकांनीही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रभाग २८ मध्ये जनजागृती
सिडको प्रभाग २८ मध्ये महापालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. प्रभागाचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार, दीपक दातीर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून, मनपा कर्मचाºयांकडून प्रभागात घरोघरी फिरून फ्रीज, कुलर, पाण्याचे साठे याबाबतचे प्रशिक्षण देऊन आरोग्यविषयी काळजी घेण्यात यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत मनपाचे अधिकारी व ४४ कर्मचारी सहभागी झाले होते.