गदिमा स्मारकासाठी नाशकात सोमवारी होणार जनजागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:06+5:302020-12-12T04:31:06+5:30
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राने स्वयंप्रेरणेने ज्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ म्हणून गौरवले, त्या महाकवी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक त्यांच्या ...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राने स्वयंप्रेरणेने ज्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ म्हणून गौरवले, त्या महाकवी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात करण्याचे आश्वासन देऊनही शासनाकडून त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे शासनाला पुन्हा स्मरण करून देण्यासाठी राज्यातील सर्व साहित्य, संस्कृती, कलाप्रेमींच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आल्यावर शुक्रवारी पुण्याच्या महापौरांनी स्मारकासाठी महिनाभरात भूमिपूजन करण्याची घोषणा केली. मात्र, पुन्हा या घोषणेचा विसर पडू नये म्हणून नाशिकसह राज्यभरात सोमवारी (दि.१४) सर्व कलाप्रेमींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागर करण्यात येणार आहे.
ज्यांच्या गीत रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. त्या गीतरामायणकार गदिमा यांच्या निधनाला येत्या १४ डिसेंबरला ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच गतवर्षीच गदिमांची जन्मशताब्दीही साजरी झाली. तरीही या महाकवीच्या स्मारकाचे काम सुरू होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सरकारला याबाबत खेद-खंत नसल्याच्या निषेधार्थ शहरातील बहुतांश साहित्यिक, गायक, संगीतकार, चित्रकार, नर्तक, शिल्पकार आणि रसिकांनी एक अभिनव जनजागर उभारायचे ठरवले आहे. हा जनजागर १४ डिसेंबरपासून सर्व कलावंत १४ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित केलेल्या जागेवर गदिमांच्या कविता वाचत, गाणी गात दिवसभर बसणार आहोत. कोरोनामुळे त्यात सर्वांना सहभागी होता येणारही नाही. त्यामुळे मोजके कलावंत गदिमांची एक कविता किंवा गाणे गायील किंवा वाचेल. हे फक्त कलावंतांचे आणि रसिकांचे आंदोलन असल्याने रसिकांसह समस्त कलाकारांनी त्यात पुढाकार घेण्याचे आवाहन गदिमाप्रेमी नाशिककरांच्या वतीने करण्यात आले आहे.