भोकणीत आजपासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:02+5:302021-04-26T04:13:02+5:30
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथे सोमवार दि. २६ एप्रिल ते १ मे पर्यंत ५ दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत ...
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथे सोमवार दि. २६ एप्रिल ते १ मे पर्यंत ५ दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या काळात आरोग्य सेवा वगळता सर्व दुकाने, हाॅटेल, टपरीधारक, पीठाची गिरणी, किराणा दुकान, रेशनिंग दुकान बंद राहणार आहे. घरपोच रेशन वितरण ग्रामविकास मंचच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तालुक्यातील पहिलीच भोकणी ग्रामपंचायत घरपोच रेशनिंग वाटप करण्यात येणारी पहिली ग्रामपंचायत आहे. सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच अरुण वाघ व वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोते यांनी केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्याची स्थिती बिकट होत चालली आहे. राज्य शासनाने वाढत्या रुग्णसंख्येमुळे कडक निर्बंध लादले असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता, कामाव्यतिरिक्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. भोकणी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला व्यावसायिक अथवा नागरिक दाद देताना दिसत नसल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने, व्यापारी व ग्रामस्थांसह फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये तातडीची बैठक घेतली.
या बैठकीत आरोग्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व पोलीस यंत्रणेने सहभाग घेतला. वावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोते व त्यांचे सहकारी पोलीस उपस्थित होते. व्यापारी तसेच छोटेखानी व मोठ्या व्यवसायदारांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सोमवार (दि. २६) सकाळी ११ वाजेपासून आरोग्य सेवा वगळता सर्व आस्थापना व व्यवसाय बंद राहतील. व्यावसायिकांना कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भोकणीचे सरपंच अरुण वाघ यांनी केले. कर्फ्यू दरम्यान व्यवसाय करताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल व गुन्हा दाखल करण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट सांगण्यात आले. वावी पोलीस ठाण्याचा या जनता कर्फ्यूमध्ये एक प्रतिनीधी उपस्थित राहील व सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने केलेल्या आदेशाचे पालन करावे असे वावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोते यांनी सांगितले.