नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव कापडणीस व त्यांच्या पुत्राच्या हत्याकांडाचा खटला लढणार सरकारी वकील उज्ज्वल निकम
By अझहर शेख | Published: April 6, 2023 04:36 PM2023-04-06T16:36:27+5:302023-04-06T16:36:38+5:30
मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दुहेरी हत्याकांड सरकारवाडा पोलिसांनी उघडकीस आणले होते.
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापिठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (७०) व त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस (३५,दोघे रा.गोपाळपार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचे अपहरण करत जिल्ह्याबाहेर घेऊन जात ठार मारल्याची घटना २०२१साली डिसेंबरमध्ये घडली होती. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये हे दुहेरी हत्याकांड सरकारवाडा पोलिसांनी उघडकीस आणले होते. हा बहुचर्चित खून खटला न्यायालयात चालविण्यासाठी सरकारपक्षाकडून विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने केली आहे. निकम यांच्यासह संशयित मुख्य सुत्रधार राहुल जगताप याच्या वतीने दोन वकिलांनी वकिलपत्र बुधवारी (दि.५) जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.
कापडणीस पिता-पुत्र राहत असलेल्या सोसायटीतच राहणारा पेशाने व्यावसायिक असलेला राहुल जगताप याने कापडणीस यांची गडगंज संपत्ती हडपण्यासाठी थंड डोक्याने दोघांच्या हत्येचा कट आखून तो डिसेंबर २०२१मध्ये तडीस नेल्याचे पोलिसांनी उघड केले होते. यावेळी संपुर्ण नाशिकसह राज्य हादरून गेले होते. वरिष्ठ पोलिस निरिक्षक साजन सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकाला वेळोवेळी मार्गदर्शन करत सखाे तपास करुन १६००पानांचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे.
हा खून खटला आता न्यायालयाच्या पटलावर आला आहे. सरकारपक्षाकडून बाजू मांडणयासाठी उज्जवल निकम यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी सरकारवाडा पोलिसांसह पोलिस आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात निकम यांच्यासह जगतापच्या वकिलांनीही वकिलपत्र सादर केले. याप्रकरणी नियिमित सुनावणी येत्या २१ एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयात होणार आहे. त्यानंतर मे महिन्यापासून या दुहेरी हत्याकांडप्रकरणी न्यायालयात युक्तीवादाला प्रारंभ होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
चौघे संशयित कारागृहात!
कापडणीस पिता-पुत्रांची निघृणपणे हत्या करणारा मुख्य सुत्रधार संशयित आरोपी राहुल जगताप याच्यासह त्याचे साथीदार संशयित प्रदीप शिरसाठ (३९,रा.सिडको), विकास हेमके (२६,रा.मखमलाबाद), सुरज मोरे (२९,रा.पंचवटी) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे चौघेही मध्यवर्ती कारागृहात आहेत. यांच्यावर पिता-पुत्रांची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कट रचण्यापासून तो तडीस नेण्यापर्यंत हे चौघेही सक्रीय होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
...असे घडले होते हत्याकांड
१) मुख्य संशयित आरोपी राहुल जगताप याच्यासोबत त्याच्या तीघा संशयित साथीदारांनी मिळून प्रथम १६ डिसेंबर २०२१साली नानासाहेब कापडणीस यांना मोटारीत बसवून शहराबाहेर घेऊन गेले. रस्त्यात त्यांचा गळा आवळून खून करत मृतदेह पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा रस्त्यावरील आंबोली घाटात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
२) नानासाहेब यांचा काटा काढल्यानंतर आठवडाभराने या चौघा संशयितांनी २७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचा मुलगा डॉ. अमित याच्यासोबत त्याच्या राहत्या घरात पार्टी केली आणि त्याचा त्याच रात्री खून करुन मृतदेह स्विफ्ट कारमधून थेट अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंडारदराजवळच्या वाकी गावात नेऊन पेटवून टाकला होता.
कापडणीस यांच्या पत्नीचा न्यायालयात अर्ज
नानासाहेब कापडणीस यांच्या पत्नीने त्यांच्या संपत्तीबाबत न्यायालयात बुधवारी अर्ज केला. या अर्जावर न्यायालयाने विचार करत सरकारपक्षाचे म्हणणे जाणून घेतले. येत्या २१ तारखेला याबाबत न्यायालयाकडून निर्णय दिला जाण्याची श्यक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.