रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:41 PM2019-02-19T17:41:56+5:302019-02-19T17:42:09+5:30
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी चक्क सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी चक्क सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामपंचायत प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत गावातील ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांची दोडी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भेट घेवून तक्रार केली आहे. मनेगावसह सोळा गाव नळपाणी पुरवठा योजनेतून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. योजनेचे पाणी गावातील सार्वजनिक विहिरीत सोडण्यात येते व त्यानतंर गावात वितरित केले जाते. दोडी ग्रामपंचायत मार्फत ग्रामनिधीतून सर्व्हीस रोड ते जलशुद्धीकरण शेडपर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. सदर कामावर संबंधित ठेकेदार मुरूम दाबण्यासाठी सार्वजनिक विहीरीतील पाण्याचा राजरोसपणे वापर केला जात असल्याने एकप्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. तालुक्यात व येथे दुष्काळी परिस्थिती असून माणसांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना अशाप्रकारे पाण्याचा गैरवापर केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सदरचा टँकर हा सहा हजार लिटर क्षमतेचा असून असे पंधरा ते वीस टँकरच्या खेपा सदर कामासाठी वापरण्यात आल्या असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.