मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल
By admin | Published: December 15, 2014 02:10 AM2014-12-15T02:10:32+5:302014-12-15T02:11:21+5:30
मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल
नाशिक : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी विश्रांतीच्या मूडमध्ये असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना सकाळी-सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक जिल्ह्यातील गारपीटग्रस्तभागाचा दौरा करणार असल्याचा सांगावा आला आणि शासकीय यंत्रणा लगोलग हलली. रविवारी मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली.
मुख्यमंत्री पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने भाजपाचे, तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नाशिकला येणारे एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही हातोहात निरोप देऊन कार्यकर्त्यांचा ताफा जमा करावा लागला.
नाशिक जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे बागलाण, निफाड, मालेगाव, नांदगाव, देवळा व येवला या तालुक्यांमध्ये सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. हिवाळी अधिवेशनात सभागृहात त्याचे तीव्र पडसाद तर उमटलेच शिवाय नुकसानग्रस्त शेतकरी रस्त्यावर येत आंदोलन करू लागले आहेत.
सोमवारी (दि.१५) विधिमंडळात याप्रश्नी रणकंदन माजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी-सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचा निरोप जिल्हा प्रशासनाकडे आला आणि प्रशासकीय यंत्रणेची एकच धांदल उडाली.
मुख्यमंत्री यांचा नियोजित दौरा मुंबईत होता. परंतु दौऱ्याच्या अर्धा तास अगोदर जिल्हा प्रशासनाला फॅक्सद्वारे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अंशत: बदल झाल्याचे सांगत ते नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार नागपूर येथून मुख्यमंत्री नाशिककडे रवाना झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. एकीकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचाही अचानक दौरा लागल्याने त्यांच्या दौऱ्यासाठीही अधिकाऱ्यांची पळापळ झाली. पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. (प्रतिनिधी)