भावार्थ रामायण ग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:49 PM2020-02-02T23:49:56+5:302020-02-03T00:20:33+5:30
मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.
नाशिक : मोह मायेच्या जगात वावरत असताना व सतत बुद्धिभ्रष्ट होत असताना वारंवार गर्तेत पडणाऱ्या शक्तिहीन जिवांसाठी असा अत्यंत सुलभ मार्ग हवा होता, याच भावनेतून ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती झाल्याचे सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांनी सांगितले.
पुणे येथील स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेच्या वतीने स्वामीनारायण मंदिराच्या बॅक्वेट हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आईसाहेब, सुधीर पांडे, सुधीर काळे, आशुतोष अडोनी, मधुकर सोनवणे, आयोजक चंद्रशेखर आहेर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वामी विद्यानंद म्हणाले की, ‘सध्याच्या काळात ईश्वरस्मरणी स्थिर होणे कठीण आहे. त्यामुळेच कमी वेळेचा, कमी श्रमाचा आणि ईश्वराप्रती खात्रीने नेणारा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. अध्यायातून सोप्या भाषे मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सद्गुरू श्री स्वामी विद्यानंद यांना त्यांच्या ज्ञानोत्तर भक्तीतून संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथराजाचे जे आकलन झाले त्यातूनच कालसुसंगत अशा श्री स्वामीजींच्या ‘भावार्थ रामायण (संक्षिप्त साकीबद्ध अनुवाद)’ या नूतन काव्यमय ग्रंथाची निर्मिती झाली आहे. सध्याच्या श्री स्वामीजींच्या अद्वैत भावावस्थेतून स्फुरलेला ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ रामायण’ ग्रंथ होय. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला असून, त्याकरिता त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्र मास स्वामी विद्यानंद सेवा मंडळ नाशिक शाखेचे चंद्रशेखर आहेर, एकनाथ ठाकरे उपस्थित होते.