‘चला खेळ खेळूया’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:42+5:302021-08-22T04:17:42+5:30
नाशिक : अनेक खेळांची थोडक्यात माहिती देणारे नाशिकमधील विविध खेळातील तज्ज्ञ व्यक्तींनी मिळून लिहिलेल्या ‘चला खेळ खेळूया’ या ...
नाशिक : अनेक खेळांची थोडक्यात माहिती देणारे नाशिकमधील विविध खेळातील तज्ज्ञ व्यक्तींनी मिळून लिहिलेल्या ‘चला खेळ खेळूया’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री छगन भुजबळ आणि प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लॉकडाऊन काळात करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी गत दीड वर्षात सर्व जग थांबले असताना पुस्तकनिर्मिती शक्य होण्यामागे सर्व क्रीडाप्रेमी तज्ज्ञांचे सहकार्य कारणीभूत ठरल्याचे सांगितले. या कालावधीत सर्व शाळा-महाविद्यालये, क्रीडा संस्था, क्लब सर्व बंद होते. त्याच कालावधीत केटीएचएमचे हेमंत पाटील यांनी क्रीडांगणे बंद झाल्याने असलेला वेळ विविध खेळांची थोडक्यात माहिती देणारे पुस्तक तयार करण्याचा विचार बोलून दाखवला. तसेच जिल्ह्यातील विविध खेळातील तज्ज्ञ खेळावर लिखाण करण्यास तयार झाल्याने या पुस्तकाची निर्मिती शक्य झाल्याचे नमूद केले. विविध खेळांची थोडक्यात माहिती एका पुस्तकात जर खेळाडू शिक्षक, पालक यांना दिली तर नक्कीच जास्तीत जास्त खेळांचा प्रचार प्रसार होऊन खेळाडूंना संधी मिळेल. तसेच पालकांनादेखील नक्की खेळ कसा आहे. ते कळणार असल्याचेही नाईक यांनी नमूद केले. पुस्तक प्रकाशनप्रसंगी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी हे पुस्तक प्रत्येकासाठी उपयोगी व मार्गदर्शक ठरेल असे सांगितले. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड, आनंद खरे, मंदार देशमुख, हेमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, संजीवनी जाधव, क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय, क्रीडा अधिकारी प्रकाश पवार, अविनाश टिळे, महेश पाटील, संदीप ढाकणे, संतोष वाघ, गौरव पगारे आदी उपस्थित होते.