दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By admin | Published: February 20, 2015 01:53 AM2015-02-20T01:53:34+5:302015-02-20T01:53:34+5:30
दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नाशिक : कवी दिलीप पाटील लिखित ‘दुरून कुठून तरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झाले. कवी हा आपल्या आत्म्याचा तुकडा वाचकांपुढे ठेवत असतो. अंत:करणाला जी भिडते तीच कविता असते, असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.प. सा. नाट्यगृहात आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी फ. मुं. शिंदे यांनी सांगितले, कवी कविता करत असला तरी प्रत्येक माणूस हा कवीच असतो. कवी पानावर लिहितो, तर वाचक मनावर लिहितो. दिलीप पाटील यांची कविता वेगळी असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कवी उत्तम कोळगावकर म्हणाले, पाटील हा गावशिवचा कवी आहे. कोंडीनंतर वीस वर्षांनी त्यांचा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होतो आहे. दोन्ही शतकांतील स्पंदने पाटील यांच्या कवितांमध्ये ठायी ठायी जाणवतात, तर श्रीमती नीलिमा पवार यांनी पाटील यांच्या कविता वास्तववादी असल्याचे सांगितले. दिलीप पाटील यांनी माझ्यातील अस्वस्थतेनेच मला लिहिते केल्याचे सांगितले. यावेळी प्रतिमा पब्लिकेशन्सचे संचालक दीपक चांदणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कवी राजेंद्र उगले व अरुण इंगळे यांनी पाटील यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक प्रा. शंकर बोऱ्हाडे यांनी, तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, मीरा पाटील आदि उपस्थित होते.