बनावट नंबरप्लेट्सद्वारे पीयूसी केंद्रांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:14 AM2019-03-14T00:14:25+5:302019-03-14T00:14:58+5:30
अधिकारी वाहनांच्या बनावट नंबरप्लेट वापरून पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याचा आणि पुन्हा त्याच केंद्रांना अडचणीत आणण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला असून, गेल्या रविवारी असाच एक प्रकार घडल्याचे समजते.
नाशिक : अधिकारी वाहनांच्या बनावट नंबरप्लेट वापरून पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याचा आणि पुन्हा त्याच केंद्रांना अडचणीत आणण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला असून, गेल्या रविवारी असाच एक प्रकार घडल्याचे समजते.
पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या वाहनाची आणि चालकाची संपूर्ण माहिती नोंद करून त्यानंतर संपूर्ण तपासणीअंती प्रमाणपत्र दिले जाते. असे असतानाही काही अपप्रवृत्तीचे लोक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित पीयूसी केंद्र आणि आरटीओला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात. याचा त्रास या केंद्र संचालकांना होत असून, वाहनांवर अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट लावून नंतर त्या केंद्रांना वेठीस धरले जात असल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्या आहेत. पीयूसी म्हणजेच मोटारींसाठी मिळणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. अशा प्रकारचे प्रमाणपत्र वाहनधारकाला उपलब्ध व्हावे यासाठी शहरात ठिंकठिकाणी पीयूसी केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्यांना प्रादेशिक परिवहन महामंडळाची मान्यतादेखील आहे. महामंडळाचे अधिनियम आणि गुणवत्ता निंयंत्रणानुसार या पीयूसी केंद्रांचे कामकाज असून, प्रमाणित केलेल्या वाहनांची संपूर्ण माहिती आरटीओला सादरही करावी लागते. गेल्या काही महिन्यात चुकीच्या लोकांकडून अनेक ठिकाणी बनावट क्रमांकाच्या वाहनांच्या साह्याने पीयूसी प्रमाणपत्र रितसर काढण्यात आले आणि नंतर तो वाहन क्रमांक मोठ्या अधिकाऱ्याच्या वाहनाचे असल्याचे सांगून पीयूसी केंद्रांकडे बोट दाखविण्यात आले. यापूर्वी जिल्हाधिकारी आणि आता मनपा आयुक्तांच्या वाहनाच्या नावाने असेच पीयूसी प्रमाणपत्र काढून आरटीओची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले असून, यात पीयूसी केंद्रांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.