भगूरला सरकारी जागेवर पोल्ट्रीफार्म, पक्की घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:14 AM2018-09-26T00:14:33+5:302018-09-26T00:15:30+5:30
भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रीडांगण आरक्षित सरकारी भूखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्रीफार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे.
भगूर : भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रीडांगण आरक्षित सरकारी भूखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्रीफार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे.
या संदर्भात बलकवडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगूरमधील सर्व्हे नं.९४५ हा शासनाच्या अखत्यारित येत असून या जागेवर नगरपालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याचा ठराव पारित केला आहे. मात्र काही झोपडपट्टीवासीयांनी या जागेवर अतिक्रमण करून वसाहतीसह अवैध धंदे सुरू केले. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही सदर अतिक्रमण हटविले जात नाही. या जागेच्या लगत राम मंदिर असून तीन शाळा व एक व्यायामशाळा आहे. अतिक्रमित जागेवर गावठी दारू, तंबाखू, गुटखा विक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ पहात आहे.
सावरकरांची जन्मभूमी असलेल्या या नगरीत देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र येथील बकाल अवस्थेमुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत असल्याचे म्हटले आहे.
बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचा-याविना
बलकवडे यांनी सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती अधिकारात जाणून घेतले असता, मुख्याधिकाºयांनी नगर परिषदेकडे २०१७ पासून कायमस्वरूपी अभियंता नाही व बांधकाम विभागाकडे एकही कर्मचारी नसल्याने कारवाई करणे शक्य झाले नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे येथील प्रशासन त्यांच्या कामात कसूर करत असल्याने त्यांच्या विरोधात भादंवि १६६ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे बलकवडे यांनी सांगितले.
कारवाई करण्याचे आश्वासन
सरकारी भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले असल्यास संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले जाईल. यात नगरपालिका कोणालाही पाठीशी घालणार नाही. शासनाने अतिक्रमणाबाबत कडक धोरण अवलंबिले असून भगूरमध्येदेखील याबाबत निश्चितपणे कठोर कारवाई होईल.
- प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी