दारणेच्या पाण्यासाठी कॉँग्रेसचा पूजापाठ व आरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 05:45 PM2018-11-01T17:45:35+5:302018-11-01T17:45:49+5:30
सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आला.
सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आला. सदर कलश तालुकाभर फिरवून जनजागृती करुन पाण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘पाणी आमच्या हक्काचं..’ अशा घोषणा देत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन निदर्शने केली.
कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली गोपाळ गायकर, कैलास दातीर, कमलाकर शेलार, दामू शेळके, पुंजाराम हारक, अर्जून घोरपडे, बाळासाहेब दळवी, तानाजी भोर, नामदेव वाजे, कचरु पवार, बबन जाधव यांच्यासह कॉँग्रेसचे कार्यकर्ते या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.
मराठवाड्यापेक्षाही भयानक दुष्काळ सिन्नर तालुक्यात असतांना हक्काचे पाणी सिन्नरला डावलून नेले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. भौगोलिकदृष्टया सिन्नर तालुका उंचावर असल्याने व आत्तापर्यंत महत्त्वकांक्षी नेतृत्त्व न मिळाल्याने सिन्नरकरांना १५ किलोमीटर अंतरावर दूर असणाऱ्या दारणा नदीपात्रातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले. आत्तापर्यंत शेतकºयांची पाण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न बळीराजासमोर आहे. दारणाचे पाणी कोनांबे धरणात टाकून देवनदी व देवनदीच्या उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे काढून शेती सुजलाम् सुफलाम करता येऊ शकते असे शिंदे यांनी सांगितले. तसेच म्हाळुंगी नदीचे पाणी पिंपळे शिवारात तवल्या बंधाºयात अडवून डुबेरेच्या जगबुडी बंधाºयात टाकून या भागातील शेतीला फायदा होऊ शकतो. मात्र सक्षम नेतृत्त्व न लाभल्याने तालुका शेतीच्या पाण्यापासून वंचित असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.
दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी शेतीसाठी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी सदर आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. दारणा नदीपात्रात भरलेला कलश तालुकाभर फिरवून शेतीचे पाणी मिळावे यासाठी जनजागृती करणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.