निधीअभावी रखडला ‘मांजरपाडा’

By admin | Published: May 29, 2016 11:05 PM2016-05-29T23:05:48+5:302016-05-30T00:36:15+5:30

येवला : सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे जलसंपदामंत्र्यांचे उद्दिष्ट

'Pump' | निधीअभावी रखडला ‘मांजरपाडा’

निधीअभावी रखडला ‘मांजरपाडा’

Next

येवला : निधीअभावी रखडलेले राज्यातील प्रकल्प निधी देऊन पूर्ण केले जातील व सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे जलसंपदा खात्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याने येवला तालुक्याच्या अस्मितेचा मांजरपाडा प्रकल्प आता मार्गी लागणार काय, अशा आशयाची जोरदार चर्चा तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात सरू झाली आहे. हा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे.
सुरगाणा तालुक्यातील केम पर्वतरांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम सध्या ठप्प झाले आहे. जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा-१ वळण योजनेबाबत आता थेट कार्यवाहीसाठी प्रयत्न करावेत आणि येवला तालुकावासीयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे..
मांजरपाडा-१ वळण योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ४५४ कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. तसेच आघाडी शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रुपयांचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिले आहे. त्यामुळे त्यातील २८ कोटीचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पासाठी वळविला आहे. २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. आता युती सरकारकडे मांजरपाडा वळण योजनेसाठी ४५४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत लालफितीत अडकलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे. येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागाच्या या प्रकल्पाचे केवळ ७५० मीटर एवढ्या लांबीच्या बोगद्यासह काही पूल व अल्पखर्चाची कामे बाकी आहेत. येवल्याच्या उत्तरपूर्व भागात थेट डोंगरगावपर्यंत पाटातून पाणी पाहण्यासाठी तीन पिढ्या खपल्या आहेत. मांजरपाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. श्रेयवादासह राजकीय लढाई निवडणुकीत राजकीय पक्षांनी जरूर खेळावी, पण तालुक्याच्या या पाणीप्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा. येवला शहर व तालुका भारतीय जनता पक्षाने या कामात आता सारे कौशल्य पणाला लावावे अशी अपेक्षा आहे. सत्तेत नसताना भाजपानेदेखील हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून भाषणबाजी केली आहे. आता मात्र निर्णायक लढ्यात उत्तरपूर्व भागात पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे जनक स्व. आमदार जनार्दन पाटील यांनी जीवनभर उत्तरपूर्व भागात पाणी यावे म्हणून अथक परिश्रम घेतले आहेत. मांजरपाडा वळण बंधाऱ्याचे बोगद्याचे गेले दोन वर्षांपासून बंद असलेले काम तत्काळ सुरु व्हावे, कृती समितीदेखील सध्या अस्तित्वात आहे. येवल्याचे आमदार छगन भुजबळ तसेच संतु पाटील झांबरे, विठ्ठल शेलार, तात्यासाहेब लहरे, देवचंद पाटील, बद्रीनाथ कोल्हे, भाऊ लहरे, सुनीता जनार्दन पाटील-पालवे, दादा पाटील नेहे, भाऊ लहरे, संजय पगारे, रामभाऊ घोडके, प्रकाश जानराव, विठ्ठल बोरसे, प्रकाश निकम, जगन्नाथ भोसले, रावसाहेब खैरनार, विठ्ठल दारूंटे, दिनकर जेजुरकर, विष्णू कुलधर, हिरालाल घुगे, संजय सोमासे, लक्ष्मण कदम, श्रीराम पाटील शिंदे, लक्ष्मण पाटील, गोवर्धन पाटील, खंडू खैरनार, एकनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर शेलार, उस्मान शेख, शिवाजी धनगे, कुसमडीचे सरपंच रामदास महाले, भीमा पवार, साईनाथ येवला, नवनाथ महाले, भाऊसाहेब शेजवळ, प्रकाश साठे, एकनाथ पवार, सोपान बारहाते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जनजागृती, आंदोलने, मोर्चे, वेगवेगळ्या प्रकारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून येवला तालुक्यात जनआंदोलनाचा रेटा सुरूच आहे. गेल्या ४० वर्षांपासून तालुक्याच्या अवर्षणप्रवण डोंगरगावपर्यंत पाणी पोहचविण्याबाबत भिजत पडलेला मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लोकप्रबोधानातून चळवळ उभी व्हावी व सत्ता बदलो अथवा स्थिर राहो पाणीप्रश्न सुटून मांजरपाडा प्रकल्प पूर्ण व्हावा या हेतूने शेतकऱ्यांत जागृती करण्याच्या उद्देशाने आंदोलने चालूच आहेत. या प्रश्नासाठी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांना पाच हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनीताताई पाटील- पालवे यांनी केला आहे. पुणेगाव धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी पुरेसे असणार नाही म्हणून तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांजरपाडा धरण व वळण बंधारे बांधण्याची योजना निर्माण करून गुजरातकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी पुणेगाव धरणात आणण्यासाठी बोगद्याचे काम हाती घेतले.
पुणेगाव धरणात पाणीसाठा वाढविण्यासाठी नवीन वळण बंधाऱ्यांच्या कामांचे नियोजन केले. आजमितीस बोगद्याचे काम ८६ टक्के पूर्ण झालेले आहे. धरण सांडव्याचे काम ६५ टक्के पूर्ण झालेले आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष घालून उर्वरित कामाला गती द्यावी, असे तालुकावासीयांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)

Web Title: 'Pump'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.