पंक्चरच्या दुकानावर संसाराचा गाडा!
By Admin | Published: December 2, 2015 11:56 PM2015-12-02T23:56:21+5:302015-12-02T23:57:12+5:30
राजेश खराडे , बीड पोलिओमुळे जन्मल्यापासूनच दोन्ही पाय निकामी... घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची... बारावीपर्यंत शिक्षण घेतले... नोकरीच्या शोधात दारोदार भटकंती केली ;
राजेश खराडे , बीड
पोलिओमुळे जन्मल्यापासूनच दोन्ही पाय निकामी... घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची... बारावीपर्यंत शिक्षण घेतले... नोकरीच्या शोधात दारोदार भटकंती केली ; परंतु पदरी निराशाच! तो मात्र जिद्द हरला नाही. उसणवारीवर भांडवल उभे करुन त्याने पंक्चरचे दुकान सुरु केले. टायरची छिद्रे बुजवितानाच संसाराचा गाडा जिद्दीने ओढणाऱ्या तरुणाचे नाव आहे संदीपान गोविंद बारगजे.
संदीपान हा पिंपळनेर (ता. शिरुर) येथील रहिवासी. गोमळवाडा - पिंपळनेर रस्त्यावर त्याचे पंक्चरचे दुकान आहे. दुचाकी, ट्रक, ट्रॅक्टरचे पंक्चर तो काढतो. त्याच्या हाताखाली कोणी मदतीलाही नाही. पाय नसले म्हणून काय झाले हात आहेत हे काय कमी आहे असे तो म्हणतो. चाक उतरविण्यापासून ते पंक्चर काढून पुन्हा चढविण्यापर्यंतची सारी कामे वेगाने करण्याची कला त्याने आत्मसात केली आहे. संदीपान व संकटे हे जणू समीकरणच बनलेले. पोलिओने दोन्ही पाय गमावलेल्या संदीपानला सुदृढ जोडीदार मिळाला. सुखाच्या संसारवेलीवर मुलाच्या रुपाने फूलही उमलले;परंतु नियतीच्या मनात काही औरच होते. वर्षभरापूर्वी पत्नी अंबिका हिचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला. पाच वर्षाचा मुलगा कृष्णा याच्यासाठी संदीपानच आता वडील अन् आईची भूमिका वटवत आहे. त्याचे आई- वडील थकले आहेत. भाऊ व भावजयी शेतात राबतात. शेती अत्यल्प, पावसाअभावी ती पिकत नाही. त्यामुळे संसाराचे ओझे पंक्चरच्या दुकानावरच आहे.
दुकान सुरु करण्यासाठी लागलेले ७० हजार त्याने मित्र, नातेवाईकांकडून उसणे घेतले होते. वर्षाच्या आत त्यांना ते परत केले. अपंगाच्या मानधनाशिवाय इतर कुठलाही लाभ त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही. मातीच्या पडक्या घरात तो वास्तव्य करतो. घरकूल मिळावे व डोक्यावर हक्काचे छत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात पाच वर्षांपासून खेटे घालतोय. मात्र,लालफितीच्या कारभारात त्याचे घराचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. बीज भांडवल सारख्या योजनांचा आधार न घेता स्वत: व्यवसाय उभा केल्याचा त्याला अभिमान आहे. इतर अपंगांच्या प्रश्नावर तो प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून लढत आहे.
आपल्या वाट्याला आलेले दु:ख मुलाच्या वाट्याला येऊ नये असे तो म्हणतो. त्याला शिकून मोठं करायचयं असा संकल्प त्याने बोलून दाखवला. संकटे परीक्षा घेण्यासाठीच येतात;परंतु न डगमगता त्याला सामोरे गेले की सारे ठीक होते.
इतरांवर विसंबून न राहता अपंगांनी स्वत:ला जमेल तसे सिद्ध केले पाहिजे अशी कष्टावरची निष्ठाही त्याच्याजवळ आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या उंबरठ्यावर असलेल्या धडधाकट तरुणांच्या डोळ्यात संदीपान बारगजेने अंजन घालण्याचे काम केले आहे.