लेखानगरला कारवाई : बनावट नोटा चलनात आणणारी पुण्याची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 03:38 PM2020-06-16T15:38:19+5:302020-06-16T15:38:54+5:30
यावेळी हे चौघे संशयित बनावट नोटा मुळ चलनात आणण्याचा प्रयत्नात असताना रंगेहात मिळून आले.
नाशिक : शहरातील अंबड भागात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील टोळक्याच्या गुन्हे शाखा युनीट-२च्या पथकाने मुसक्या बांधल्या. लेखानगर येथून त्यांना बेड्या ठोकत पोलिसांनी साडेबारा हजार रूपयांचे मुल्य असलेल्या परंतू बनावट नोटा जप्त केल्या. तसेच सात लाख रूपये किंमतीचे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनसुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , लेखानगर येथे संशयित समाधान सोपान भगत (४०, रा. पिंपळेगुरव, पुणे), रविंद्र शांताराम बाईत (४४, रा. जॉली क्लबनगर, दापोडी, पुणे), जगन्नाथ दत्तु जाधव (६०, रा. नागपुरचाळ, येरवडा जेल समोर, पुणे), निल उत्तम सातिदवे (४२, रा. कैलासनगर, औरंगाबाद) यांना सापळा रचून अटक केली. हे टोळके लेखानगर भागात नव्या चलनातील २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पथकाने सापळा रचला. यावेळी हे चौघे संशयित बनावट नोटा मुळ चलनात आणण्याचा प्रयत्नात असताना रंगेहात मिळून आले. त्यांच्याकडून २०० रुपये दराच्या १७ व ५०० रूपये दराच्या १८बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.