मुलींची अश्लील चित्रफित प्रसारित करणाऱ्यास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 01:33 AM2022-05-07T01:33:05+5:302022-05-07T01:34:30+5:30
मैत्रीचे संबंधात मुलींसोबत भ्रमणध्वनीमध्ये फोटो काढून नंतर त्यावर मार्फींग करून अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यास न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सायबर क्राईमच्या माध्यमातून दाखल झालेल्या या गुन्ह्यात पहिल्यांदाच आरोपीला शिक्षा झाल्याचे मानले जात आहे.
नाशिक : मैत्रीचे संबंधात मुलींसोबत भ्रमणध्वनीमध्ये फोटो काढून नंतर त्यावर मार्फींग करून अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यास न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सायबर क्राईमच्या माध्यमातून दाखल झालेल्या या गुन्ह्यात पहिल्यांदाच आरोपीला शिक्षा झाल्याचे मानले जात आहे. सन २०१७ मध्ये या संदर्भात एका पीडित तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयित आरोपी अक्षय श्रीपाद राव याने अगोदर पीडित तरुणीशी मैत्री केली व त्यातून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत फोटो काढले. या फोटोंच्या माध्यमातून तो पीडित तरुणीला भेटण्यासाठी बोलावत होता. दरम्यान त्याच्या हेेतू विषयी शंका आल्याने सदर पीडित तरुणीने त्याच्याशी ‘ब्रेकअप’ केला त्यामुळे तो आणखीनच चिडला होता. त्यामुळे त्याने मूळ फोटोंना मार्फिंग करून त्याचे अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमावर व्हायरल केले होते. हा प्रकार घडत असतांनाच त्याने आणखी एका नवीन तरुणीशी अशाच प्रकारे मैत्रीचे संबंध तयार केले व तिलाही लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेगवेगळे फोटो काढले होते व तिला देखील अशाच प्रकारे त्याने धमकावणे सुरू केले. दरम्यान पहिल्या पीडित तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात अक्षय राव याच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करताच दुसऱ्या पीडित तरुणीनेही पोलिसात धाव घेतली होती. याप्रकरणी सायबर क्राईम तसेच विनयभंग या गुन्ह्याखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एल. भोसले यांच्यासमोर होऊन सरकारतर्फे ॲड. सुधीर सपकाळे यांनी युक्तिवाद केला तसेच दोन्ही पीडित तरुणींचे जबाब, आरोपीच्या मोबाइल व लॅपटॉपमध्ये सापडलेले छायाचित्रांचा पुरावा म्हणून वापर करण्यात येऊन गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी अक्षय राव यास विनयभंगाच्या आरोपाखाली सहा महिने सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड, कलम ३५४ (क) अन्वये एक वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये एक वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
चौकट===
पीडितांनी समोर यावे
सायबर गुन्ह्यात बरेचसे पीडित महिला, तरुणी भीतीपोटी पुढे येत नाहीत. समाजात बदनामी होण्याची भीती असते. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला शिक्षा मिळत असल्याचे या गुन्ह्यातून सिद्ध झाले आहे.
- ॲड. सुधीर सपकाळे, सरकारी वकील
(फोटो ०६ सपकाळे)