इगतपुरीत १०२ विनामास्क कामगारांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:49+5:302021-03-20T04:14:49+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली असून कोरोना रोखण्यासाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे ...
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली असून कोरोना रोखण्यासाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात आठवडे बाजार, तसेच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवशीही जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने वगळता अन्य दुकाने , व्यवहार व आस्थापने बंद राहत असल्याने मजुरी, रोजगार आदींचा प्रश्न निर्माण होत आहे. चार दिवसांपासून तालुक्यात अचानक रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातही सर्वच गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुरु झाल्या आहेत. घोटी, इगतपुरी, कांचनगाव, टाकेद आदी ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुका आरोग्य प्रशासनाने गेल्या आठवडाभरात जवळपास एक हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आले आहे.
सद्यस्थितीत तालुक्यात ८१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असून काही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे, कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे आदी बाबींची गांभीर्याने अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो...
वीस हजारांचा दंड वसूल
गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, भरत वेंदे, घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.१८) तालुक्यातील जिंदाल कंपनीत जाऊन नियमांच्या अंमलबजावणीची तपासणी केली असता अनेक कामगार विनामास्क वावरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. या बाबीची दखल घेत १०२ कामगारांना प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पळे यांनी दिली.