विद्यार्थ्यांची फुलली कला
By admin | Published: November 30, 2015 11:01 PM2015-11-30T23:01:17+5:302015-11-30T23:02:10+5:30
आगळा प्रयत्न : काव्यसंग्रह, चित्रप्रदर्शनाला मान्यवरांची दाद
नाशिक : माध्यमिक शाळेतली मुले... कोणाला चित्रकलेत आनंद, तर कोणी कवितांत रमणारे... एका सर्जनशील कलाशिक्षकाने त्यांच्यातला हा ‘स्पार्क’ ओळखला, धावपळ करीत सगळे जमवून आणले आणि चक्क या पाचवी-सातवीतल्या विद्यार्थ्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले... चिमुकल्यांचा हा कलाविष्कार पाहून मान्यवरही थक्क झाले...
कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. सिन्नर तालुक्यातल्या ठाणगावच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ‘पारंबीचा झुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व ‘कलास्पंदन’ या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. कलाशिक्षक राहुल पगारे यांनी विद्यार्थ्यांतील कलागुण हेरून त्यांना प्रोत्साहित केले. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, एन. एम. आव्हाड, ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत, ज्येष्ठ उद्योजक अशोक कटारिया, कवी संतोष पवार, नीलेश भारती, अॅड. भगीरथ शिंदे, मुख्याध्यापक आर. डी. पगार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. ‘पारंबीचा झुला’तील कवितांचे लेखन शुभम वाघ, करिश्मा काकड, महेश शिंदे, तेजल सहाणे, भाग्यश्री ढोन्नर, आकांक्षा एखंडे, रितिका आमले, प्रशांत कोळी या आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी केले असून, त्यांचे संपादन शीतल काकड, तर सहसंपादन प्रांजल भोर हिने केले आहे. यावेळी विनायकदादा पाटील म्हणाले, कवितांच्या मिरवणुकीत शब्द पायी चालतात आणि अर्थ अंबारीतून येतो. म्हणून कवितेत शब्दांपेक्षा आशयाला अधिक महत्त्व असते. या मुलांच्या कवितांतही याचा प्रत्यय येतो.
यावेळी शीतल काकड हिने सादर केलेल्या ‘बाप’ या कवितेने अनेकांचे डोळे पाणावले. किरण भावसार, अॅड. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात गायत्री मोरे, चंचल काकड व नीलेश जाधव या सातवीच्या विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप भोर यांनी आभार मानले. रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे आदिंसह रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)