आदिवासी महामंडळामार्फत एक लाख क्विंटल भाताची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:32 AM2021-12-08T01:32:35+5:302021-12-08T01:33:05+5:30
आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला १९४० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. आधारभूत किमतीत भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नाशिक : आदिवासी विकास महामंडळामार्फत दोन महिन्यांत राज्यातील विविध खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार क्विंटल धानाची (भात) खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी अ ग्रेड भाताला १९६० रुपये तर सर्वसाधारण भाताला १९४० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. आधारभूत किमतीत भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत दरवर्षी आधारभूत खरेदी योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी भागांमध्ये भाताची खरेदी केली जाते. खरीप पणन हंगाम २०२१-२२ साठीची खरेदी १ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. यासाठी राज्यात विभागनिहाय एकूण २८६ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. सर्वाधिक केंद्र नागपूर विभागात (१७३) असून त्या खालोखाल नाशिक विभागात ५८ खरेदी केंद्रे आहेत. हंगाम सुरु झाल्यानंतर एकूण ५४ केंद्रांवर प्रत्यक्ष माल दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपासून खरेदीस सुरुवात झाली असून आतापर्यंत ४८२६ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार ३१५ .२२ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. भात खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये ३२२९ बिगर आदिवासी तर १५९७ आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे. भात खरेदीला आदिवासी भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून गतवर्षी याच काळात ९० हजार क्विंटलच्या जवळपास भात खरेदी करण्यात आली होती. खरेदी केंद्रांवर भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे अदा करण्यात येत असल्याने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असतात. यासाठी शेतकऱ्यांना आगावू नोंदणी करणे बंधनकारक आहे.
चौकट-
शासनाच्या नियमानुसार ज्या भातात आर्द्रतेचे प्रमाण १२ ते १७ टक्के आहे अशाच भाताची खरेदी केंद्रांवर खरेदी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर भात आणताना तो व्यवस्थित वाळवून व साफ करुन आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.