महिला बचत गटाच्या माध्यमातून बियाणे खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 12:41 AM2021-06-08T00:41:01+5:302021-06-08T00:41:51+5:30
जळगाव नेऊर : सध्या अनेक भागात वरुणराजा बरसत आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला भांडवलाची चिंता भेडसावत असते, यावर उपाय म्हणून येवला तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद महिला उमेद स्वयंसहायता समुहातील महिलांनी बचत केलेल्या रक्कमेतुन शेतीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करून बचतीचा सदुपयोग केला आहे.

एरंडगाव, जळगाव नेऊर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली असुन शेतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. तसेच या भागात पेरणीची लगबग सुरु झाली असुन, बऱ्याच शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठी पर्याप्त पैसा उपलब्ध नसतो, अशावेळी उधार, उसनवार, अथवा बँका, पतसंस्था यांच्याकडे सोनेतारण कर्ज घेऊन पैशाची गरज भागविली जाते. ही बाब लक्षात घेऊन या गटातील महिलांनी वर्षभर बचत करून गटातील प्रत्येक महिला सदस्याला बियाणे खरेदीसाठी रक्कम देऊन शेतीला हातभार लावला आहे.
वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या गटाने या अगोदरही बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य सदुपयोग केला आहे.
या उपक्रमामुळे बचत गटाचे अध्यक्ष मंगला खकाळे, सचिव सुवर्णा पडोळ, सदस्य शिला शिंदे, सुवर्णा वसंत पडोळ, मंदा शिंदे, ज्योती खकाळे, छाया शिंदे, मंगला शिंदे, सुमन पडोळ, कविता रंधे, सुनीता पडोळ, अलका शिंदे या महिलांचे परिसरात कौतुक होत आहे.
समुहातील महिलांचे सक्षमीकरण होत असुन बचतीच्या रक्कमेचा योग्य वेळी वापर होत आहे. तसेच गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसुन येत आहे.
- सुवर्णा पडोळ, सचिव, स्वामी विवेकानंद महिला बचत गट.