भाजपला धक्का, मनसे स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:35 AM2021-07-29T01:35:48+5:302021-07-29T01:36:10+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मनसे’ गंभीर घेतल्या असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे पंधरवड्यातच दुसऱ्यांदा अन्य नेत्यांना घेऊन नाशकात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी नेते संदीप देशपांडे यांनी मात्र स्वबळाची भाषा करून भाजपला धक्का दिला आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या दत्तक नाशिक घोषणेवर टीका करण्यात आल्याने आता निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधिकारी हेच टार्गेट असेल असे स्पष्ट झाले आहे.
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मनसे’ गंभीर घेतल्या असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे पंधरवड्यातच दुसऱ्यांदा अन्य नेत्यांना घेऊन नाशकात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी नेते संदीप देशपांडे यांनी मात्र स्वबळाची भाषा करून भाजपला धक्का दिला आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या दत्तक नाशिक घोषणेवर टीका करण्यात आल्याने आता निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधिकारी हेच टार्गेट असेल असे स्पष्ट झाले आहे.
अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने मिशन नाशिक महापालिका आरंभले असून, पंधरा दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे नाशिकला आले होते. त्यानंतर लगेचच बुधवारी (दि. २८) अमित ठाकरे तसेच संदीप देशपांडे, अमेय खोपकर, ठाण्याचे अविनाश जाधव, कामगार सेनेचे उपाध्यक्ष सचिन गोळे नाशिकला दाखल झाले. ३१ प्रभागांतील सर्व शाखा अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, निवडणूक लढलेले आणि पराभूत झालेले उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी राजगडावर त्यांनी संवाद साधला. प्रभाग रचना, त्यातील पक्षाची ताकद आणि अन्य राजकीय, सामाजिक समीकरणांची त्यांनी माहिती घेतली.
गेल्या वेळी राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर भेट झाल्याने युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी स्वबळावरच महापालिकेच्या निवडणुका लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपवर टीका करताना भाजपची दत्तक नाशिक ही मोहीम फेल ठरल्याचे सांगितले. भाजपने शहर दत्तक घेतले असले तरी गेल्या साडेचार वर्षांत शहराचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही, मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांनी जे प्रकल्प साकारले तसे काम यापूर्वीही कधी झालेलेे नाही, असा दावा देशपांडे यांनी केला.
इन्फो...
आज राज यांच्या ड्रीम प्रोजेक्टची पाहणी
राज ठाकरे यांच्या संकल्पेतून साकारलेले बॉटनिकल गार्डन तसेच बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाची पाहणी अमित ठाकरे आज, गुरुवारी करणार आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत.
इन्फो..
कलाकार अमित ठाकरे यांनी रेखाटले चित्र...
बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबच कला, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित आहे. बाळासाहेब आणि राज यांची अर्कचित्रे तर अत्यंत गाजलेली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या अमित ठाकरे यांनीदेखील बुधवारी (दि. २८) अत्यंत सहजगत्या पेन फिरवत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना रेखाटलेले चित्र उपस्थितांना सुखद धक्का देणारे ठरले. पंधरा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्यानंतर राजगडावरील बैठका संपल्यावर शासकीय विश्रामगृहावरील लॉन्सवरच नाशिकच्या युनायटेड क्लबबरोबर फुटबॉल खेळून स्ट्रायकरचे कौशल्य दाखवले. आता त्यांनी रेखाटलेल्या चित्रातून देखील अंगभूत चित्रकलेची चुणूक दाखवून दिली.