पुष्पप्रेमींनी फुलले राजीव गांधी भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:19 AM2019-02-25T01:19:38+5:302019-02-25T01:19:56+5:30
महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता.
नाशिक : महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता. यावेळी पुष्पोत्सवामधील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महापालिकेच्या वतीने शरणपूररोडवरील राजीव गांधी भवन येथे भरविलेल्या तीन दिवसीय पुष्पोत्सवाचा उत्स्फूर्त गर्दीने समारोप झाला. याप्रसंगी विजेत्यांचा गौरव करण्यात आला. आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी, मिसेस ग्लोबल डॉ. नमिता कोहोक, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक वर्षा भालेराव, वैशाली भोसले, मुकेश शहाणे, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले आदी मान्यवर उपस्थित होते.
कोहक म्हणाल्या, की जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचा फुलांशी संबंध येतो. फुलांसोबत प्रत्येकाचे अतुट नाते असते. या रंगीबेरंगी दुनियाची सफर नाशिककरांना पुन्हा प्रशासनाने घडविल्याचा आनंद झाला. माझ्या आजारपणाच्या कालावधीत मला ‘निशीगंधा’ या फुलाचा मोठा आधार लाभला. पुष्पोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांची झालेली अलोट गर्दीने मनपा मुख्यालयाला जणू फुलांच्या जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे कोहोक यांनी यावेळी सांगितले.
गमे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, महापालिकेच्या वतीने ‘देवराई’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत ३१ मोकळ्या भूखंडांवर भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करुन संवर्धन केले जाणार आहे. यामुळे शहराचे पर्यावरण संतुलन टिकून राहण्यास मदत होईल.
असे आहेत विजेते
सोनाली काठे (गुलाबपुष्प गट), सागर मोटकरी (पांढरा गुलाब), बाबुलाल नर्सरी (फळे-भाजीपाला), आनंद बोरा (गुलाबपुष्प), पपर्या नर्सरी (हंगामी फुले), अंकुर महापात्रा (मोसमी फुले), सुकदेव महापात्रा, सरोज कॅक्टस (कुंडीतील शोभीवंत वनस्पती), पुष्परचना-खुला गट- अश्विनी शिरोडे, स्वप्नाली जडे, शालेय गट-सोनी साळवे सानिका जिंतूरकर, जपानी पुष्परचना व ताज्या फुलांची आकर्षक रचना-स्वप्नाली जडे, सुनीता जडे, शुष्क काष्ट पुष्परचना-स्मृती जिंतुरकर, स्वप्नाली जडे, सुनीता जडे, पुष्प रांगोळी-पूजा बेलदार, मनीषा सालकाडे, पुष्पहार-वर्षा पाटील, निकिता पाटील, पुष्पगुच्छ-विश्वकर्मा डेकोरेटर्स, माधुरी लढ्ढा, फळे-भाजीपाला-कच्च्या भाज्यांची सजावट- प्रज्ञा चव्हाणके, पंकजा जोशी, पल्लवी बोराडे (निंबध), मनीषा पूरकर, साक्षी बोराडे (कविता).