पक्षाअंतर्गत गटबाजीला आवर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:46+5:302021-07-19T04:11:46+5:30
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षाअंतर्गत कुरबुरी व गटबाजीसंदर्भात त्यांच्यापर्यंत तक्रारी ...
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षाअंतर्गत कुरबुरी व गटबाजीसंदर्भात त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे पक्षाचे नेते अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी पक्षाचे शहरातील मध्यवर्ती कार्यालय, राजगड येथे दुसऱ्या दिवशीही पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत पक्षांतर्गत गटबाजीला आवर घालण्याच्या सूचना केल्या आहेत.
मनसे अध्यक्ष नाशिकहून पुण्याला रवाना झाल्यानंतर अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी पक्षाचे पदाधिकारी अंकुश पवार, रतनकुमार इचम, अशोक मुर्तडक, आनंता सूर्यवंशी, सलीम शेख, योगेश शेवरे यांच्याशी संवाद साधतानाच पक्षांतर्गत गटबाजी संपवून आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शनिवारी पक्षातील वेगवेगळ्या गटांनी त्यांची भेट घेऊन पक्षासाठी स्थापनेपासून काम करूनही पक्षात न्यायाची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हाच प्रकार अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी शहरातील विभागनिहाय पदाधिकाऱ्यांसोबत साधलेल्या संवादातही समोर आल्याने रविवारी अमित ठाकरे यांनी नाशिक जिल्हा व शहरच्या प्रमुख पदाधिकऱ्यांना खडेबोल सुनावतानाच पक्षांतर्गत गटबाजी व कुरबुरी संपवून पक्षबांधणीवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनविसेचे जिल्हाप्रमुख शाम गोहाड यांच्यासह विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, रामदास दातीर, बंटी लभडे, विक्रम कदम, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष कोरडे, विनायक पगारे, ज्ञानेश्वर बगडे, सत्यम खंडाळे, अरुण दातीर, विजय ठाकरे, अजिंक्य बोडके आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.