आरक्षणाच्या पाठपुराव्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:26+5:302020-12-14T04:30:26+5:30
नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या आदेशापूर्वीपासूनच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले २ हजार १८५ तालाठी उमेदवार, मेट्रो, राज्यसेवा, ...
नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या आदेशापूर्वीपासूनच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले २ हजार १८५ तालाठी उमेदवार, मेट्रो, राज्यसेवा, महावितरण भरतीतील एसईबीसी मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, तसेच विधिमंडळातील आमदारांनी या उमेदवारांचे प्रश्न अधिवेशनात मांडून मराठा समाजातील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी सरकारवर दबाव निर्माण करावा यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे नाशिक शहरातील आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, राहुल ढिकले, सुहास कांदे यांना मराठा निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर ९ डिसेंबरच्या सुनावणीत आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणात २५ जानेवारीपासून सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सकरात्मक भूमिका मांडत आरक्षणासंबंधी पाठपुरावा करावा यासाठी आमदारांनी आगामी अधिवेशनात आवाज उठवत सरकारवर दबाव निर्माण करावा, अशी विनंती या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळाने आमदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश सुलभ करण्यासाठी आवश्यक ठिकाणी सुपर न्युमररी जागा तयार करुन उपाययोजना कराव्यात, शहरात पंजाबराव देशमुख वसतिगृह बांधले जावे आदी मागण्याही सकल मराठा समाजातर्फे करण्यात आल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, आशीष हिरे, नवनाथ शिंदे, योगेश गांगुर्डे, किरण बोरसे, शिवा गुंजाळ, भारत पिंगळे, वैभव दळवी आदी उपस्थित होते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील उर्वरित आमदारांना संबधित तालुक्यातील समन्वयकांमार्फत निवेदन दिले जाणार असल्याची माहितीही राज्य समन्वयकांनी दिली आहे.
(आरफोटो- १३ मराठा रिजर्वेशन) आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, राहुल ढिकले यांना निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांच्या समवेत सुनील बागुल, आशीष हिरे, नवनाथ शिंदे, योगेश गांगुर्डे, किरण बोरसे, शिवा गुंजाळ, भारत पिंगळे, वैभव दळवी आदी.