माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 06:01 AM2024-03-10T06:01:51+5:302024-03-10T06:02:32+5:30
मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : सध्याचे राजकारण म्हणजे आळवावरचे पाणी झाले आहे. कोण कोणत्या पक्षात अन् कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. वरून दाखवायला वेगळे व आतून सर्वजण एकच असल्याचा टोला लगावत माझ्या हातात सत्ता द्या, मी भोंगे बंद करून दाखवतो, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले.
शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी आयोजित सभेत ठाकरे यांनी २८ मिनिटांच्या भाषणात सध्याच्या राजकारणावर प्रहार केला. यावेळी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित हाेते.
माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत...
माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत, इतरांची नाही. दुसऱ्याची पोरं आपल्या कडेवर घेऊन खेळवायची मला हौस नाही, असा टोला त्यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लगावला.
आरक्षणासाठी अडचण
राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही. राष्ट्रवादी निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आले असे सांगून राज ठाकरे म्हणाले, की जरांगे-पाटील यांना मी तेव्हाच म्हणालो होतो, आरक्षणासाठी तांत्रिक अडचण आहे. सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका.