शाळांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन फाइव्ह स्टार पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:15 AM2019-06-19T01:15:04+5:302019-06-19T01:16:52+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे, त्यासाठी प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे, त्यासाठी प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ गुणवत्तेशी जोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने मंगळवारी शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मूल्यमापन आवश्यक असून, यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाइव्ह स्टार पद्धत सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी पाच स्टार, ७० ते ८० टक्के दरम्यान गुण असलेल्या शाळांसाठी चार स्टार, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन स्टार, ५० ते ६० टक्के गुण असणाऱ्या शाळांसाठी २ स्टार व ४० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी १ स्टार याप्रमाणे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या शाळांसाठी १ ब्लॅक स्पॉट, ३० टक्क्यांपेक्षाही कमी गुण असलेल्या शाळांसाठी २ ब्लॅक स्पॉट देण्यात येणार आहे.
ज्या शिक्षकांना १ किंवा २ ब्लॅक स्पॉट मिळतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असून, यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना ६ महिने संधी देण्यात येणार असून, अपेक्षित सुधारणा झाल्यास वेतनवाढ पूर्ववत करण्याचे ठरविण्यात आले.
गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी दरमहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीमध्येच प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात येणार आहे.
प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करावयाचे असून, त्यानंतर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्रतिनिधी यांच्यामार्फत पुनर्मूल्यांकन करण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआरमधून शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर घेण्यात येणार असून, १०० शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. तसेच व्हर्च्यूअल क्लासरूमद्वारे विविध तज्ज्ञ शिक्षकांचे व्याख्यान तसेच उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले. बैठकीस माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह प्रादेशिक, विद्या प्राधिकरण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षण अधिकारी, विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षक उपस्थित होते.
पदाधिकारी, पालकांचे सहकार्य घेणार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचीही मदत घेण्यात येणार आहे. पदाधिकाºयांनी व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी शाळेत जाऊन याबाबत माहिती घ्यावी. पालकांनी पालकसभेत उपस्थित राहून आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत शिक्षकांशी चर्चा करावी. ग्रामस्तरीय शिक्षण समितीनेदेखील प्रत्येक शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.