अन्नधान्याची राणी नागलीला मिळावी प्रतिष्ठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 04:31 PM2020-09-19T16:31:34+5:302020-09-19T16:32:06+5:30
पेठ : शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वाधिक पौष्टिक समजल्या जाणाऱ्या व धान्याची राणी म्हणून ओळख असलेल्या नागली पिकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पेठ तालुक्यात नागालीवर प्रक्रियाउद्योग सुरू होण्याची आवश्यकता असून, शासनाच्या विकेल तेच पिकेल अभियानांतर्गत पेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने नागली प्रक्रियाउद्योग प्रकल्प सादर करण्यात आला आहे.
पेठ : शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वाधिक पौष्टिक समजल्या जाणाऱ्या व धान्याची राणी म्हणून ओळख असलेल्या नागली पिकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पेठ तालुक्यात नागालीवर प्रक्रियाउद्योग सुरू होण्याची आवश्यकता असून, शासनाच्या विकेल तेच पिकेल अभियानांतर्गत पेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने नागली प्रक्रियाउद्योग प्रकल्प सादर करण्यात आला आहे.
पेठ ,सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नागली हे प्रमुख पीक असून, दैनंदिन आहारातही या धान्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डोंगर उतारावर व हलक्या जमिनीत हे पिक घेतले जात असून, नागलीवर करण्यात येणारे प्रक्रियाउद्योग या भागात नसल्याने वर्षानुवर्षे नागली फक्त भाकरीसाठीच वापरली जात आहे. शहरी भागात दुर्मीळ असणारी नागली जेथे पिकते तेथे मात्र दुर्लक्षित असून, नागालीला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाच्या विकेल तेच पिकेल या अभियानात पेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने नागली प्रक्रियाउद्योग प्रकल्प शासनाला सादर करण्यात आला आहे.
पेठ तालुक्यात जवळपास ७ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लावणी केली जात असून, साधारण ५ हजार ६६४ टन उत्पादन येते. अजून नागलीला पाहिजे तसा भाव व महत्त्व नसल्याने शेतकरी घरातील मागील वर्षाचेच बियाणे वापरून रोपं तयार करत असल्याने उत्पादनाची मर्यादा घटली आहे.केवळ निसर्गावर अवलंबून असलेल्या या पिकावर कोणत्याही प्रकारची रासायनिक खते वापरली जात नसल्याने ते पूर्णपणे सेंद्रिय आहे. नागलीपासून भाकर, पेज, भरडा, पापड, बिस्कीट, चिक्की यासह विविध पदार्थ तयार केले जात असून, स्थानिक ठिकाणी असे प्रक्रियाउद्योग सुरू केल्यास नागालीलाही सुगीचे दिवस नक्कीच येतील .(१९पेठ२)
--------
असे आहेत नागलीचे गुणधर्म
नागली उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम, लोह, प्रथिने, तंतुमय जीवनसत्त्व, खनिजे असल्याने शरीरास पौष्टिक आहे. नागलीच्या सेवनाने रक्ताशयसारखे आजार कमी होतात, शिवाय हाडांच्या मजबुतीसाठीही नागली उपयुक्तअसते. लहान मुलांना नागलीची पेज अथवा बिस्कीट दिली जातात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
पेठ तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर नागली पिकवली जात असली तरी केवळ भाकरी करून जेवणात वापर करण्यापलीकडे तिचा फारसा वापर होताना दिसून येत नाही. आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असलेल्या नागली पिकाचा कृषी विभागाच्या वतीने सविस्तर अभ्यास करून विकेल तेच पिकेल अभियानांतर्गत प्रोजेक्ट तयार करून शासनाला सादर करण्यात आला आहे.
-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ