वैद्यकीय विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:45 PM2017-10-25T23:45:29+5:302017-10-26T00:28:15+5:30
पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयासह परिचारिकांच्या हलगर्जीपणाचे दर्शन घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वैद्यकीय विभागाने आता मनपाच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांतील कर्मचाºयांना तंबी दिली असून, खातेनिहाय चौकशीचा इशारा दिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या एकूणच कारभाराबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उभे राहत आले असून, प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेल्या वैद्यकीय विभागाविषयी तक्रारींचा पाढा काही संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.
नाशिक : पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयासह परिचारिकांच्या हलगर्जीपणाचे दर्शन घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वैद्यकीय विभागाने आता मनपाच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांतील कर्मचाºयांना तंबी दिली असून, खातेनिहाय चौकशीचा इशारा दिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या एकूणच कारभाराबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उभे राहत आले असून, प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेल्या वैद्यकीय विभागाविषयी तक्रारींचा पाढा काही संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. महापालिकेमार्फत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, सिडकोतील मोरवाडी रुग्णालय तसेच पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय यांसह ३० शहरी आरोग्य केंद्र चालविले जातात. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची घडी पूर्णत: विस्कटली आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तर नेहमीच वादग्रस्त ठरत आले आहे. वेगवेगळ्या घटनांनी नेहमीच चर्चेत असलेल्या या रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे कामही रखडलेले आहे. जवळपास सर्वच रुग्णालयांसह शहरी आरोग्य केंद्रांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. निव्वळ औषध व साहित्य खरेदीतच रस दाखविणाºया वैद्यकीय विभागाकडून रुग्णांना देण्यात येणाºया सेवांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मनपाच्या रुग्णालयांमध्ये घडणाºया घटना-घडामोडींचे पडसाद वारंवार महासभांसह स्थायी समिती, प्रभाग समिती सभांमध्ये उमटत आले आहेत परंतु, त्यात सुधारणा होऊ शकलेली नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानधनावर डॉक्टरांची नेमणूक केली जाते. त्यातही घोळ कायम आहे. याशिवाय, महापालिकेच्या सेवेत असूनही खासगी प्रॅक्टीस करणाºया वैद्यकीय अधिकाºयांविषयीही वारंवार तक्रारी येऊनही त्याबाबत कारवाई केली गेलेली नाही. वैद्यकीय विभागाचे अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर प्रभारी कार्यभार आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डेकाटे यांनी जून महिन्यात ११ ते १५ वर्षांपर्यंत एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ४४ वैद्यकीय अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गरुड यांची बदली बिटको रुग्णालयात तर मोरवाडी रुग्णालयातील डॉ. प्रशांत थेटे यांची बदली कथडा रुग्णालयात करण्यात आली होती. बिटकोचे डॉ. जयंत फुलकर व कथडाचे डॉ. राजेंद्र भंडारी यांच्याही बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु, बरेच जण आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. बिटको रुग्णालयातील डॉ. फुलकर यांच्याविषयी स्थायी समितीच्या सभेत मुशीर सय्यद यांनी खासगी प्रॅक्टीस करत असल्याचे पुरावे सादर केले होते परंतु, त्याबाबतही प्रशासनाकडून जलदगतीने कार्यवाही झाली नाही. याउलट डॉ. फुलकर अद्यापही बिटको रुग्णालयात कार्यरत आहेत. मध्यंतरी, बिटको रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात बेडवर रुग्णांऐवजी चक्क श्वानांनी ताणून दिल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, केवळ समज देण्यापलीकडे कारवाई झालेली नाही. वैद्यकीय विभागामार्फत सद्यस्थितीत डेंग्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवरही नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आले आहे. एकूणच वैद्यकीय विभागाचा कारभारच ‘रामभरोसे’ झाल्याने रुग्णालयातील कर्मचाºयांवरही कुणाचा अंकुश राहिला नसल्याची वस्तुस्थिती आहे.
पूर्णवेळ अधिकाºयांची गरज
वैद्यकीय विभागाची धुरा डॉ. विजय डेकाटे यांच्या हाती सोपविण्यात आलेली आहे. मुळात डॉ. डेकाटे यांची आरोग्याधिकारी म्हणून कारकीर्द वादग्रस्त ठरलेली असताना त्यांच्या हाती वैद्यकीय विभागाची सूत्रे का देण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. डॉ. डेकाटे यांची दोन महिन्यांपूर्वीच बदली झालेली आहे. याशिवाय, त्यांची घंटागाडी प्रकरणात विभागीय चौकशी लावण्यात आलेली आहे. डेकाटे यांना कार्यमुक्तीचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागाला पूर्णवेळ अधिकाºयाची गरज निर्माण झालेली आहे. वैद्यकीय विभागाप्रमाणेच आरोग्य विभागही प्रभारीच्या हाती सोपविण्यात आला आहे.