टॅँकरप्रश्नी प्रशासन पेचात
By admin | Published: August 1, 2016 12:45 AM2016-08-01T00:45:53+5:302016-08-01T00:46:18+5:30
मुदत संपुष्टात : पाणीटंचाई कायम
नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, तर पावसाच्या हजेरीने खरिपाच्या पेरणीत होत असलेली वाढ कायम असली तरी अद्यापही ग्रामीण भागात सुमारे शंभराहून अधिक गावे, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर सुरू ठेवण्याची मुदत ३१ जुलैअखेर असल्याने सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
जून महिन्यात लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना जूनअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली होती. तत्पूर्वी एप्रिल व मे महिन्यांतील भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जनतेला मागणीनुसार तत्काळ पाणीपुरवठा करणे सोपे व्हावे म्हणून शासनाने टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले होते. त्यामुळे जूनअखेर पाऊस लांबल्यामुळे शासनाने ३१ जुलैअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास अनुमती दिली.
नाशिक जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली ती अद्यापपर्यंत कायम आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच, नद्या, नाले भरून वाहू लागले आहे. परंतु नांदगाव, येवला, बागलाण, मालेगाव व सिन्नर या पाच तालुक्यांत अजूनही पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडलेला
नाही. परिणामी खरिपाच्या पेरण्याही
होऊ शकल्या नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम
आहे.
जुलैअखेरपर्यंत बागलाण, मालेगाव, सिन्नर, येवला, नांदगाव या पाच तालुक्यांतील २६ गावे, ७७ वाड्यांना २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
परंतु शासनाने दिलेली मुदत रविवारी संपुष्टात येत असल्याने तहसीलदारांनाही आता टॅँकर सुरू करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)