लीज लॅन्डचा प्रश्न लागला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:44 AM2018-11-20T00:44:42+5:302018-11-20T00:45:30+5:30
रक्षा संपदा विभागाच्या नव्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळालीच्या १३५ पैकी १३३ लीज लँडच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, यातील दोन प्रकरणांवर बोर्डात चर्चा करण्यात आली.
देवळाली कॅम्प : रक्षा संपदा विभागाच्या नव्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळालीच्या १३५ पैकी १३३ लीज लँडच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, यातील दोन प्रकरणांवर बोर्डात चर्चा करण्यात आली. भविष्यात या नव्या निर्णयाने जागा फ्री होल्ड करणाऱ्या नागरिकांसाठीदेखील आशादायक निर्णय घेण्यात येणार असल्याने देवळालीकरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेला तणाव दूर होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत रक्षा मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डातील लीज, फ्री होल्ड केसेसबाबत निर्णय घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या या बैठकीत देवळालीतील १३५ भाडेपट्टा करारातील १३३ केसेस मार्गी लागल्या असून उर्वरित वॉर्ड क्र.१ मधील एक, तर वॉर्ड क्र.२ मधील एक अशा दोनच केस प्रलंबित असून सर्वच नगरसेवकांनी याबाबत या दोन्ही केसेस सदर बाजार भागातील असल्याने त्यांचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनाही न्याय कसा देता येईल याची मागणी केली. बैठकीत शहराच्या क्रीडा संकुल व व्यापारी संकुलासाठी आवश्यक असणाºया निधीची लवकरात लवकर उपलब्धता, डिसेंबर महिन्यात सदर्न कमांड विभागातील होणाºया कल्चरल मीटसाठी होणाºया खर्चाबाबत चर्चा करण्याबरोबर विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
तत्पूर्वी बैठकीत बोर्डाच्या उपाध्यक्षा मीना करंजकर यांच्या सासूबाई, माजी उपाध्यक्ष सुनंदा कदम यांच्या सासूबाई यांचे निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बैठकीस बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, अॅडम कमांडंट राहुल मिश्रा, कर्नल कमलेश चव्हाण, गेरीसन इंजिनियर कर्नल कमलेश चव्हाण, सीईओ अजयकुमार आदी उपस्थित होते.
स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाला आदेश
बैठक संपताच ब्रिगेडियर पी. रमेश यांसह लष्करी सदस्य व नगरसेवक भगवान कटारिया यांनी शहरातील विविध समस्यांची पाहणी करीत पार्किंग, अतिक्रमण या स्वच्छतेबाबत योग्य ते निर्देश विविध विभागप्रमुखांना दिले. यामध्ये मुल्ला कॉम्प्लेक्स परिसरातील सार्वजनिक मुतारी तातडीने स्वच्छ करण्याबाबत आरोग्य विभागाला आदेश देत त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली.