स्मार्ट सिटी अभियानामुळे विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह
By admin | Published: November 29, 2015 12:06 AM2015-11-29T00:06:13+5:302015-11-29T00:06:34+5:30
संधीचे करा सोने : मनपा आयुक्तांनीच केले आवाहन
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात सहभागी होण्यासाठी आपण जे जे सुचवू ते ते मान्य होण्यासारखे आहे, त्यामुळे संधीचे सोने करा, असे आवाहन खुद्द महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी पालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करतानाच वाढीव एफएसआय, पूररेषेतील रेड लाइन व ब्लू लाइन दरम्यान बांधकामास परवानगी आदिंबाबत आश्वासने दिली. नगररचनाचे उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्या उपस्थितीत आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुधारित शहर विकास आराखड्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी स्मार्ट सिटी अभियानाबाबत पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापौर- उपमहापौरांसह सर्वपक्षीय गटनेते, पदाधिकारी आणि जुने नाशिक परिसरातील नगरसेवक यांच्यासमोर सादरीकरण केले. यावेळी आयुक्तांनी जुन्या नाशिकचा नक्षाच बदलून टाकणारे सादरीकरण करताना पदाधिकाऱ्यांना काही आश्वासनेही दिली. जुने नाशिकमध्ये पुनर्विकासांतर्गत जुने वाडे, इमारती या विकसित करताना दुपटीने एफएसआय देण्याबाबत आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आयुक्तांनी सांगितले. सध्या सुधारित शहर विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असून, त्याला मंजुरी मिळण्यासाठी आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास आराखडा लागू होण्यापूर्वी स्मार्ट सिटी अभियानासाठी होणारी मागणी मान्य होण्यासारखी असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार स्मार्ट सिटी अभियानाबाबत कोणताही निर्णय घेऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्मार्ट सिटी अभियानाबाबत महापालिकेकडून सादर होणाऱ्या प्रस्तावात विकास आराखड्यातील तरतुदी, नियमांना छेद देणाऱ्या काही बाबी असतील, तर त्याचा परिणाम विकास आराखड्यावरही होणार आहे. त्यामुळे, प्रस्तावित विकास आराखड्याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी विकास आराखडा तयार केला ते प्रकाश भुक्ते बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मात्र बैठकीपुढे कोणतेही मत प्रदर्शित केले नाही. (प्रतिनिधी)