विमान दुर्घटनेतील पीक पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:59 AM2018-07-07T01:59:08+5:302018-07-07T02:01:42+5:30
नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
२७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ओझरच्या एचएएल विमानतळावरून चाचणीसाठी आकाशात उड्डाण घेतलेल्या सुखोई या लढाऊ विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते निफाड तालुक्यातील वावीठुशी शिवारात शेतजमिनीवर कोसळले होते. या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे खाली उतरल्याने जीवितहानी टळली असली तरी, या दुर्घटनेत पाच ते सात शेतगटांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. साधारणत: या भागात द्राक्षबागाच असल्यामुळे विमान कोसळल्याने बागा जमीनदोस्त झाल्या, तर दूरवर विमानाचे अवशेष विखुरल्याने शेतीपीक नष्ट झाले होते. एका शेतकºयाच्या शेतात मोठा खड्डा झाल्याने नजीकच्या काळात याठिकाणी शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले होते.
इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीवर विश्वास ठेवण्यास शासकीय यंत्रणा तयार नसून, या संदर्भात निफाड उपविभागीय अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना पत्र पाठवून विमान दुर्घटनेच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी खात्याने संवेदनशीलता दाखविली नसल्याचा ठपका ठेवत या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, तर जिल्हा प्रशासनानेही सदरचा अहवाल पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवून दिला असून, त्यांना फेरपंचानामा करून निश्चित नुकसानीची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शेतकºयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई एचएएलकडून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच या शेतकºयांना भरपाई मिळणार आहे. विमान दुर्घटना नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे शेतकºयांना शासकीय मदत देय नाही.
प्राथमिक अहवाल सादर
या दुर्घटनेची दखल घेत निफाडच्या उपविभागीय अधिकाºयांनी तलाठी, मंडल अधिकाºयांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी सहायकाच्या मदतीने गोरठा व वावी येथील गट नंबर १६७, २८६, २८२, १३४, २४८, २८३, २७६ आदी गटांतील द्राक्षबागांचे पंचनामे करण्यात येऊन त्यात सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करणारा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.