रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण

By admin | Published: February 2, 2015 01:25 AM2015-02-02T01:25:06+5:302015-02-02T01:26:32+5:30

रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण

Question mark on the use of conventional blood tests in blood banks | रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण

रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण

Next

नाशिक : गेल्या पाच वर्षांत दूषित रक्तामुळे राज्यातील सुमारे एक हजार रुग्णांना एचआयव्हीची लागण झाल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय एड््स नियंत्रण संघटनेने उघड केल्यानंतर रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अद्ययावत तंत्राचा अवलंब करत नॅट टेस्टेड सुरक्षित रक्ताचा आग्रह आता रुग्णालयांकडूनच होऊ लागला आहे. दरम्यान, नाशिकमधील आयएमए-अर्पण थॅलेसेमिया केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया पीडित रुग्णांना गेल्या तीन वर्षांपासून नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा केला जात असून, अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने केलेल्या चाचण्यांमुळे एकाही रुग्णाला एचआयव्ही अथवा काविळीची बाधा पोहोचली नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जाला उत्तर देताना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने गेल्या पाच वर्षांची आकडेवारी समोर ठेवत भीषण वास्तव मांडले होते. दूषित रक्तातून एचआयव्हीची बाधा झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या गुजरात आणि उत्तर प्रदेशात असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या दूषित रक्तपुरवठ्याबाबत रक्तपेढ्यांतील अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव ही रक्त देण्याघेण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख अडचण असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले असून, पारंपरिक एलायझा चाचणीतून होणाऱ्या निदानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये आजही एलायझा चाचणीद्वारेच एचआयव्ही / काविळीचे निदान करत रक्तपुरवठा केला जातो, परंतु या चाचणीतही आता धोके दिसू लागल्याने अद्ययावत तंत्राचा अवलंब करत नॅट टेस्टेड रक्ताचा पुरवठा करण्यावर रक्तपेढ्याही भर देऊ लागल्या असून, त्यासंबंधी रुग्णांसह डॉक्टरांनाही सजग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नाशकात अर्पण रक्तपेढी, जनकल्याण यांच्यामार्फत नॅट टेस्टेड रक्तपुरवठ्याची सुविधा आहे. त्यातही अर्पण रक्तपेढीने स्वत:ची अद्ययावत लॅबच नाशकात उभारलेली आहे. अर्पण रक्तपेढीत आतापर्यंत २२३१८ रक्तपिशव्यांवर नॅट टेस्ट करण्यात आली आहे. त्यात ४५ रक्तघटक हे एचआयव्ही, कावीळ बी आणि सी बाधित आढळल्याचे आणि विशेष म्हणजे हेच रक्तघटक एलायझा चाचणीत निगेटिव्ह आढळून आले आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार, एलायझा चाचणीत विषाणूंमधील प्रथिन घटक सापडतात, तर नॅट टेस्ंिटगमध्ये विषाणूंमधील डीएनए / आरएनए सापडतात. याशिवाय एलायझा चाचणीत विषाणूबाधित रक्तदाता हा २२ दिवस ते २ महिन्यांच्या कालावधीत बाधित झाल्याचे आढळून येते, तर नॅट टेस्टिंगमध्ये हीच प्रक्रिया केवळ २ ते ५ दिवसांत होते. एलायझा चाचणीद्वारे मिळणारी रक्तपिशवी कमी खर्चात उपलब्ध होत असली तरी त्यात धोके जाणवू लागल्याने रक्तपेढ्यांनाही आता ही चाचणी करणे जबाबदारीचे बनले असून, अद्ययावत तंत्राचा अवलंब करत नॅट टेस्टेड रक्ताचा पुरवठा करण्याबाबत रुग्णालयेही आग्रह धरू लागली आहेत. नाशिकमधील अनेक नामवंत रुग्णालयांसह काही खासगी डॉक्टरांकडून नॅट टेस्टेड रक्ताचाच आग्रह धरला जात असल्याचे रक्तपेढ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Question mark on the use of conventional blood tests in blood banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.