काजी गढीवासीयांचा सवाल : आम्ही जायचं कुठं? प्रशासन म्हणतं तात्पुरता निवारा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 02:26 PM2019-07-06T14:26:37+5:302019-07-06T14:47:49+5:30
काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते.
नाशिक : जुने नाशिकमधील धोकादायक झालेली काजीची गढी रहिवाशांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ रिकामी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना केले जात आहे; मात्र रहिवाशी त्यांच्या भूमिकेवर अद्याप ठाम असून ‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’ अशी मागणी त्यांनी धरली आहे. पावसाळ्यापुरते महापालिकेने रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये केली आहे. शनिवारी (दि.६) दुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिले आहे.काजीची गढी गोदावरीच्या काठाच्या दिशेने धोकादायक झाली आहे. काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली ‘आॅन दी स्पॉट’ सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते. रहिवाशांना केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडून शांत बसलेले महापालिका प्रशासन या वृत्तानंतर खडबडून जागे झाले. रहिवशांच्या स्थलांतराची तात्पुरत्या स्वरूपात बी.डी. भालेकर शाळा, गाडगे महाराज धर्मशाळा, चव्हाट्यामधील रंगारवाडा मनपा शाळा या तीन ठिकाणी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर सातत्याने आपत्ती व्यवस्थापनाकडून रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन करण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळी महापालिका उपआयुक्त महेश डोईफोडे, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, पश्चिम विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे, प्रभारी शहर अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी पोलिसांच्या मदतीने गढीवर भेट दिली. यावेळी कर्मचाºयांनी रहिवाशांना स्थलांतर करण्याची विनंती केली. पावसाळ्यात गढीचा धोका अधिक वाढला असून तात्पुरत्या स्वरूपात आपल्या कुटुंबासह मनपाने उपलब्ध करून दिलेल्या निवा-यात आश्रय घ्यावा असे आवाहन करण्यात आले. मात्र रहिवाशांनी ‘नेमिची येतो पावसाळा...तसे नेमिच येता अधिकारी...’ असे मानून स्थलांतरास विरोध दर्शविला. ‘आमच्या जीवाची एवढी काळजी आहे, तर पावसाळ्यात का धावत येतात? अन्य दिवस कोठे जातात? असा संतप्त प्रश्नही गढीवासीयांनी यावेळी अधिका-यांपुढे उपस्थित केला. यावेळी मात्र प्रशासनाचे प्रतिनिधी निरूत्तर झाले.
दुपारनंतर पोलिसांची मदत घेत रहिवाशांना तात्पुरत्या निवारास्थळी स्थलांतर करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे नरसिंगे यांनी सांगितले.