शिंदे गावालगतचा भरावाचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:20 AM2017-10-30T00:20:24+5:302017-10-30T00:20:37+5:30
नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शिंदे गावालगत नियोजित भराव पुलाबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी त्या ठिकाणी पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा करण्याची मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावला.
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शिंदे गावालगत नियोजित भराव पुलाबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी त्या ठिकाणी पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा करण्याची मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावला. नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणात शिंदे येथे करण्यात येत असलेल्या भराव पुलास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तेथील चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. चौपदरीकरणाच्या कामात बाधित झालेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्री हनुमान मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामात स्लॅब व शंकराच्या मंदिराजवळील पाणी साठवण बंधारा बांधून देण्यात यावा, याबाबत एकमत झाल्याने शिंदे येथील भराव पुलाचा रखडलेला प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्यस्थीमुळे मार्गी लागला. यावेळी सरपंच माधुरी तुंगार, बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, चेतक कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील हजारे, उपसरपंच नितीन जाधव, स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सांगळे, पोलीस पाटील रवींद्र जाधव, अशोक बोराडे, ज्ञानेश्वर मते, ज्ञानेश्वर जाधव, दत्तू तुंगार, बाजीराव जाधव, संजय तुंगार, तानाजी जाधव, अनिल ढेरिंगे, विष्णू तुंगार, सुदाम जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार हेमंत गोडसे यांनी ग्रामस्थ, राष्टÑीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार चेतक कंपनी अधिकारी यांची एकत्र बैठक घेऊन सर्व परिस्थिती जाणून घेतली. शिंदे गावाकडून शासकीय कार्यालये, महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूस जाण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीसमोर पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.