दर्जेदार शिक्षणाने प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:18 AM2019-03-04T00:18:37+5:302019-03-04T00:19:21+5:30

नाशिक : शिक्षणाशिवाय प्रगती नाही, असा विचार करून समाजधुरिणांनी दूरदृष्टिकोन ठेवून मोठ्या कष्टाने शिक्षणसंस्था उभारल्या. परंतु दुर्दैवाने आता काही शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरू केली आहे. त्यामुळे जनमाणसात संस्थांविषयी चांगले मत राहिले नाही. मात्र दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले तर शिक्षणसंस्थांना विद्यार्थ्यांची भासणारी कमतरता दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.

The question will be solved by quality education | दर्जेदार शिक्षणाने प्रश्न सुटतील

नाशिकच्या नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या आवारात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, छगन भुजबळ, कोंडाजीमामा आव्हाड, पंकजा मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवार : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण

नाशिक : शिक्षणाशिवाय प्रगती नाही, असा विचार करून समाजधुरिणांनी दूरदृष्टिकोन ठेवून मोठ्या कष्टाने शिक्षणसंस्था उभारल्या. परंतु दुर्दैवाने आता काही शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरू केली आहे. त्यामुळे जनमाणसात संस्थांविषयी चांगले मत राहिले नाही. मात्र दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले तर शिक्षणसंस्थांना विद्यार्थ्यांची भासणारी कमतरता दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जितेंद्र आव्हाड हे होते. आपल्या भाषणात शरद पवार यांनी महाराष्टÑातील मुंबई, सातारा वा प्रांतापाठोपाठ नाशिकमध्ये समाजधुरिणांनी पुढच्या पिढीचा विचार करून शिक्षण संस्था उभ्या केल्या, नवीन पिढीसाठी या संस्था म्हणजे शिक्षणासाठी मोठी दालने झाली आहेत, परंतु नंतरच्या काळात शिक्षण संस्था म्हणजे दुकानदारी झाल्यागत सुरू झाल्या व अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी विद्यार्थी मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. संस्था आहे पण विद्यार्थी कोठून आणायचे असा प्रश्न उभा राहून जर संस्था अडचणीत येत असतील तर अशा वेळी विद्यार्थ्यांना उत्तम व दर्जेदार शिक्षण दिले तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा व संस्थांचाही मोठा प्रश्न सुटेल. वसंतराव नाईक संस्थेचा नावलौकिक पाहता, या संस्थेच्या सभासदांनी शक्य असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर लघु व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिल्यास आजचे विद्यार्थी उद्याचे उद्योजक होतील, असा आशावादही व्यक्त केला.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत केलेल्या कामांची आठवण सांगताना पवार यांनी, शून्यातून संघर्ष करून निर्माण झालेला नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे होय, अशा शब्दात गौरव केला. मुंडे यांच्यासोबत विधिमंडळात तसेच अन्य क्षेत्रात एकत्र काम करण्याचे अनेक प्रसंग आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढविली तसेच सरकारवर टीकाटिप्पणी करून सामान्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून ते सोडवून घेतल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळातच ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले होते, त्याच धर्तीवर गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्टÑाची प्रगती करायची असेल तर ऊर्जा निर्मितीला महत्त्व देत भरीव काम केले, दुर्दैवाने आज ऊर्जा उद्योगाकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल पवार यांनी खंत व्यक्त केली.
मुंडे बहुजन समाजाचे नेते- छगन भुजबळ
बहुजन समाजाच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून लढा दिल्याचे सांगून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, ओबीसी समाजाच्या देशपातळीवर जनगणना करण्यात यावी, या आमच्या मागणीला देशात सर्वात प्रथम गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा दर्शविला व भारतीय जनता पक्षालादेखील त्याचे महत्त्व पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, परंतु अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही हे मुंडे यांचे काम पुढे न्यावे लागेल, असे सांगितले. चार वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेतच आपण व्ही. एन. नाईक संस्थेला स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा भेट देऊ असे जाहीर केले होते, याचे अनावरण आज पूर्ण झाल्याबद्दल भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मार्गदर्शन केले. मुंडे आणि आम्ही सत्तेत व विरोधी बाकावर बसून काम केले, परंतु सामान्यांच्या प्रश्नांवर प्रसंगी टोकाची भूमिका घेत प्रश्न सोडवणूक करण्याचे कसब मुंडे यांच्यामध्ये होते, असे ते म्हणाले.
प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद तसेच स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविक तर अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, अनिल कदम, हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, देवीदास पिंगळे, दिलीप बनकर, प्रकाश महाजन, विजयश्री चुंभळे, जगन्नाथ धात्रक, भारती पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी तर आभार प्रभाकर धात्रक यांनी मानले.
समाजहितासाठी ‘दादागिरी’ करू- पंकजा मुंडे
मुंबईसह अन्यत्र वंजारी समाज सर्वत्र विखुरलेला असून, या समाजाची दादागिरी असल्याचे म्हटले जाते. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर दादागिरी करावी लागते, समाजाच्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल व त्यासाठी जर अडचणी येत असतील तर दादागिरी करण्यासही आपण मागेपुढे पाहणार नाही, मात्र त्यात सकारात्मकता असेल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. राजकारणाचा वारसा आपल्याला वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाला असून, तेच खरे आपले राजकीय नेते असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात नसते तर आज आपणही प्रेक्षकात बसून भाषण ऐकत बसलो असतो, राजकारण हे विचार व आदर्शावर चालत असते. आज सत्तेत असले तरी विरोधकांकडूनदेखील राजकारणाचे धडे आपण घेत असतो, असे सांगून त्यांनी शरद पवार यांच्या एकूणच कारकिर्दीकडे पाहिले तरी निम्मे राजकारण शिकायला मिळेल. त्यामुळेच साऱ्या देशाचे लक्ष त्यांच्याकडे असते, असे सांगितले. नाईक संस्थेने अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले व त्यांचा पुतळा बसविल्याने नक्कीच या संस्थेची गरिमा वाढली असल्याचे सांगितले. आपल्याकडे राज्यातून कार्यकर्ते मुंडे यांच्या पुतळ्यासाठी मदतीसाठी येतात, परंतु आपण त्यांना स्पष्ट नकार देतो. पुतळ्यापेक्षा मुंडे यांच्या आचार, विचारावर चालणारे भरीव कार्य करणाऱ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.
...आणि पवार यांनी पुढे केला पंकजाकडे कोरा कागद
आपल्या भाषणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्याकडे आपण कधीही आर्थिक मदतीसाठी गेलो असता, पन्नास लाख, एक कोटी रुपये त्यांनी कोºया कागदावर लिहून दिल्याचे सांगितले. आव्हाड यांचे भाषण विचारपूर्वक ऐकणाºया शरद पवार यांनी लागलीच आपल्या शेजारी बसलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे आपल्याकडील कोरा कागद पुढे करून अप्रत्यक्ष मदतीची अपेक्षा व्यक्त केली. पवार यांनी कागद पुढे करताच, पंकजा मुंडे यांना मात्र हसू आवरता आले नाही, तशीच परिस्थिती उपस्थितांची झाली. सर्वांनी पवार यांच्या या समयसुचकतेला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. भाषणात आव्हाड यांनी पुढे, संस्थेचा विकास करायचा असेल तर मोक्याच्या जागा विकून त्या पैशातून अन्य ठिकाणी जागा घ्यावी तसेच डोंगरे मैदानावर शैक्षणिक संकुल तसेच व्यावसायिक संकुल उभारून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करावी, असे आवाहन केले.
पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून ५० लाखांची मदत
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांच्या अधिपत्याखालील ‘पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’कडून पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली. परंतु ही रक्कम संस्थेने खर्च न करता मुदतठेव म्हणून ठेवावी व त्याच्या व्याजापोटी मिळणाºया रकमेतून क्रांतिवीर वसंतराव नाईक व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, असा सल्ला दिला. त्यासाठी एक शिष्यवृत्ती विद्यार्थिनीला व एक विद्यार्थ्याला द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या शिष्यवृत्तीची संकल्पना आपल्याला नाशिकला निघताना मुलगी सुप्रिया हिने दिल्याचे सांगायलाही पवार विसरले नाहीत.
दिलीपकुमार ते पादुकोन
या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी झाली नसली तरी एकमेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात आपण शरद पवार यांना महानायक दिलीपकुमार यांची उपमा दिल्याची आठवण पंकजा मुंडे यांनी दिली. परंतु आपले भाषण आटोपताच पवार यांनी आपल्याला सध्याची टॉप अभिनेत्री कोण अशी मला विचारणा केल्यावर मी दीपिका पादुकोेनचे नाव सांगितले. पवार यांनी असे विचारण्यामागचे कारण मला तेव्हा कळाले नाही, मात्र त्यांच्या भाषणात त्यांनी आपण त्याकाळचे दिलीपकुमार असू तर आत्ताची दीपिका पादुकोन पंकजा मुंडे आहे, असे सांगून आपली फिरकी घेतल्याची आठवण मुंडे यांनी सांगितली.

Web Title: The question will be solved by quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.