शेतक-यांच्या प्रश्नांसाठी पेठ येथे रास्ता रोको, माकपा, राष्ट्रवादीसह काँग्रेस, मनसेचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 10:25 PM2017-11-06T22:25:56+5:302017-11-06T22:28:09+5:30
कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक-बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
पेठ (नाशिक)- तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक-बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
माकपाचे आमदार जे.पी. गावीत, राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी मागील आठवडयात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र शासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. निराधार योजनेचा लाभ मिळावा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, वनजमिनीचा प्रश्न मार्गी लागावा, घरकूल योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, नदीजोड प्रकल्प तात्काळ थांबवा, पर्यटन विकास करावा, भारनियमन रद्द करावे, शासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी आदी मागण्यासाठी माकपा, किसानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पेठ शहरातून मोर्चा काढत जुना बस स्टँडवर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
जवळपास दहा तासांपासून सुरू असलेल्या रास्ता रोकोत आंदोलकांनी सोबत भाकरी बांधून आणल्या असून रात्रीच्या मुक्कामाच्या तयारीत आंदोलक सहभागी झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली आहे. रात्र झाल्याने आता आंदोलकांनी आंदोलन स्थळीच रात्रीचा मुक्काम ठोकण्याचा निर्धार केला आहे.