Maharashtra Lok Sabha Election 2024 बहुतांश मतदार केंद्रांवर मतदारांच्या लागल्या रांगा
By धनंजय रिसोडकर | Published: May 20, 2024 09:12 AM2024-05-20T09:12:37+5:302024-05-20T09:15:25+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024 सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
नाशिक (धनंजय रिसोडकर) : शहरात सकाळी ७ वाजेपासूनच मतदारराजा बाहेर पडला असून नाशिक मध्य भागातील बहुतांश मतदान केंद्रांवर नागरिक मतदानासाठी येऊन रांगा लावून शिस्तबद्धपणे मतदान करीत आहेत. मतदान केंद्रांवर सकाळी ८.३० वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्याचेही दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
काही मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या बुथवर नागरिक त्यांचे नाव शोधत असल्याने तर बुथवर मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याने कुटुंबातील एक जण बाहेरच थांबून बाकीचे कुटुंबीय मतदान करीत असल्याचेही दिसून येत आहे . त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारा बाहेर देखील नागरिक घोळक्याने उभे असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश केंद्रांवर मतदान अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धपणे सुरु होते. काही मतदान केंद्रांच्या प्रवेशव्दारापासून मतदानाच्या बुथचे अंतर खूप लांब असल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना नेण्यासाठीदेखील व्हीलचेअरचा वापर केला जात असल्याचे दिसत होते. सकाळी ८ नंतर मतदारांची गर्दी वाढली असून पहिल्या दीड तासात प्रत्येक बुथवर सरासरी ८० ते १०० नागरिकांचे मतदान झाले होते.