नाशकातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 01:02 PM2020-06-12T13:02:36+5:302020-06-12T13:03:58+5:30
बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.
नाशिक : शहरातील विविध खासगी व सार्वजिनिक क्षेत्रातील बँकांसमोरग्राहकांच्या रांगा कायम असून अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमा पुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.
नाशिक शहरात लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिलता मिळत असताना नागरिकांच्या गरजाही वाढल्या असून वैयक्तीक व कौटुंबिक गरजेच्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजणांकडून सुरक्षित भविष्यासाठी जमविलेल्या जमा पुंजी अर्थात मूदत ठेवी मोडून गरजा भागविण्याचा प्रयत्न होत आहे. काही ग्राहक याच मुदत ठेवी तारण ठेवून त्यावर अल्प कर्ज मिळविण्यासाठी बँकांमध्ये येत आहेत. त्यांच्यासोबतच जनधन खात्यावर दरमहा जमा होणारे पाचशे रुपये काढण्यासाठी येणाऱ्या महिला ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने बँकांबाहेर ग्राहकांच्या रांगा दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अजूनही अनेक नागरिकांना एटीएम अथवा डेबीट कार्डचा वापर करता येत नाही. तसेच मोबाईल अॅपही वापरता येत नाही असे ग्राहकही बँकेत पैसे काढण्यासाठी येत असल्याने बँकांसमोर ग्राहकांची गर्दी वाढली आहे.