सातपूरच्या ऑक्सिजन प्लांटबाहेर वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:57+5:302021-04-25T04:13:57+5:30
सातपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. उत्पादन आणि वापर यातील तफावत दिवसेंदिवस वाढतच ...
सातपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. उत्पादन आणि वापर यातील तफावत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजन घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे अतोनात हाल होत असून, काही रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा ऑक्सिजन आणि लागणारा ऑक्सिजन यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेरुन ऑक्सिजन मागवावा लागत आहे. कोरोनापूर्वी म्हणजेच गतवर्षी नाशिकमध्ये ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या सहा उद्योगांकडून ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन करण्यात येत होते. त्यामुळे उद्योगांसह रुग्णालयांना पुरवठा केला जात असे आणि त्यावेळी कोरोना रुग्णांसाठी २७ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. त्यानंतर नवीन तीन उद्योग सुरु झाल्याने एकूण नऊ कारखान्यांमधून दररोज ९५ ते १०५ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. या उद्योगांनी आपली क्षमता जवळपास दुपटीने वाढवली असली, तरीही ऑक्सिजनचा तुटवडाच भासत आहे. जिल्हा प्रशासनाने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करुन तो रुग्णालयांसाठी वापरात आणला आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतीत ऑक्सिजनचे उत्पादन करणारा कारखाना असून, या उद्योगातून ऑक्सिजन घेण्यासाठी दिवस-रात्र वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. बहुतांश रुग्णालयांची वाहने ऑक्सिजन सिलिंडर भरुन घेण्यासाठी दिवस-रात्र २४ तास रांगेत उभी आहेत. वाहनचालकांना ताटकळत राहावे लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास आठ ते दहा तास ऑक्सिजन भरुन मिळण्यासाठी वाहनांना प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
(फोटो २४ सातपूर) - सातपूर औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत वाहने उभी आहेत.