शीघ्र कृती दलाचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:53 PM2020-05-19T23:53:35+5:302020-05-20T00:10:45+5:30
कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) साजरी होत आहे. पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.
नाशिक : कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) साजरी होत आहे. पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.
येत्या २५ तारखेला रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन तसेच कलम-१४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांत पाठविलेल्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांपैकी नाशिकमध्येही एक तुकडी दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण १२५ जवान आहेत. त्यामध्ये डेप्युटी कमांडंट, सहायक आयुक्त- २, पोलीस निरीक्षक- ३, उपनिरीक्षक- ४, महिला कर्मचारी- १० आणि उर्वरित जवानांचा फौजफाटा आहे.
यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मशिदी पूर्णपणे बंदच राहणार असून, नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच उपासना (इबादत) करावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी खतीब यांच्यासह धर्मगुरूंची बैठकही झाली. या बैठकीत शब-ए-कद्र तसेच रमजान ईदच्या नमाजपठणाबाबत चर्चा करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामुदायिक नमाजपठण करणे टाळावे, असे आवाहन यावेळी सहायक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक साजन सोनवणे आदी उपस्थित होते. बैठकीला रजा अकादमीचे एजाज रझा, मौलाना महेबूब आलम, मौलाना कारी अझहर, मौलाना मुजफ्फर अत्तार, हाजी जाकीर अन्सारी आदी उपस्थित होते.
भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी, तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. नागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावे,
असे आवाहन यावेळी करण्यात आले.