सारे कसे शांत शांत..!
By admin | Published: February 20, 2017 12:24 AM2017-02-20T00:24:23+5:302017-02-20T00:24:42+5:30
आचारसंहितेची भीती : सायंकाळनंतर भोंगे बंद, फलक उतरविले
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता झाली आणि ध्वनिवर्धकांचा आवाज शांत झाला. प्रचार फलक उतरविले गेले. उमेदवारांचे एसएमएस थांबले त्यामुळे सायंकाळनंतर ‘सारे कसे शांत शांत’ असे वाटू लागले. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने राजकीय फलक हटविले. मात्र, त्यानंतर अधिकृत उमेदवारांनी ठिकठिकाणी फलक लावले होते. प्रचाराच्या कालावधीत सकाळ होत नाही तोच मोटारींमधून प्रचाराची गाणी आणि मतदारांना आवाहन करणारे भोंगे सुरू होत. सुरवातीला हे सारे सुसह्य होते, परंतु दिवसभर अशाप्रकारची प्रचार करणाऱ्या मोटारी धावत असल्याने नागरिकांना शेवट शेवट हा प्रचार अडचणीचा ठरला. विशेषत: दहावी - बारावीला पाल्य असलेल्या पालकांना या प्रचाराचा वीट आला होता. अभ्यासाच्या वेळी या प्रचाराचा व्यत्यय येत होता. त्यातच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे घरोघर आगमन, पत्रकांचे वाटप जोरात सुरू होते. एकावेळी चार उमेदवार आणि त्यांचे समर्थक असे किमान पन्नास जणांचे कार्यकर्ते घरोघर जात असल्याने आणि एकेक उमेदवार दोन ते चार वेळा फिरकत असल्याने नागरिकही प्रचार संपण्याचीच जणू वाट बघत होते.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता झाली आणि कर्णककर्श आवाजातील तोच तो प्रचार थांबला. जाहीर प्रचार थांबल्याने उमेदवारांच्या समर्थकांनी तातडीने प्रचार फलक हटविण्यास प्रारंभ झाला आणि सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास फलक पूर्णत: हटविला गेल्याने शहर स्वच्छ झाले. उमेदवारांचे एसएमएस आणि व्हॉट््स अॅप प्रचारही बऱ्यापैकी थांबला आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)