आर. के. पवार यांची अखेर चौकशी होणार
By admin | Published: September 2, 2016 11:29 PM2016-09-02T23:29:37+5:302016-09-02T23:30:13+5:30
आर. के. पवार यांची अखेर चौकशी होणार
नाशिक : महापालिकेच्या खतप्रकल्पातील विविध कामांच्या अनियमिततेबाबत ठपका ठेवलेले निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा महासभेने केलेला ठराव अखेर महापौरांच्या स्वाक्षरीने नगरसचिव विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे पवार यांच्याविरुद्ध चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेने पाथर्डी फाटा परिसरात उभारलेल्या खतप्रकल्पातील विविध कामांच्या अनियमिततेबाबत ठपका ठेवलेले निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार यांच्याविरुद्ध तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव जूनमध्ये झालेल्या महासभेत ठेवण्यात आला होता. त्यावेळी पवार यांची चौकशी लांबविण्याचा सत्ताधारी मनसेचा डाव शिवसेनेने उधळून लावला होता. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने महापौर अशोक मुर्तडक यांनी अखेर पवार यांच्या विभागीय चौकशीला मान्यता दिली होती. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी पवार यांच्या चौकशीच्या ठरावावर महापौरांनी स्वाक्षरी केली असून, तो नगरसचिव विभागाकडे प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)