रात्रीतून बुजविले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:16 PM2017-07-30T23:16:39+5:302017-07-31T00:12:37+5:30
राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते.
दिंडोरी : मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौºयावर येणार हे अचानक जाहीर झाले. नाशिक-दिंडोरी मार्गे देवदर्शनाला येणार असल्याचे समजल्यानंतर येथील रस्ते रात्रीतून दुरुस्त करण्यात आले. यामुळे येथील रस्त्यांसह वाहनचालकांनाही अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू झाली. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत तातडीची बैठक घेत, तालुक्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने धिम्या गतीने का होईना पण खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने कामात अडथळा येत होता. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांचा आकार वाढत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंजुरीशिवाय कोणत्याही रस्त्याची डागडुजी करता येत नाही. मंजुरीशिवाय ठेकेदाराला पैसे मिळत नाही. त्यामुळे ठेकेदार मंजुरीच्या आधी काम करत नाही, असे सांगण्यात आले. असेच काही कारणे सांगून या रस्त्याची दुरवस्था कायम ठेवण्यात आली होती. रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळायची तेव्हा मिळेल; पण आत्ता तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले पाहिजे. मुख्यमंत्री येणार आहेत ना? रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कोणी उत्तरे द्यायची? मग काय सर्व बांधकाम यंत्रणा कामाला लागली. एका रात्रीत सर्व खड्डे मंजुरीआधी खडी, मुरूम टाकून का होईना पण बुजवले. यानिमित्त नाशिक-दिंडोरी मार्गाला मुरूम टाकून का होईना ‘अच्छे दिन’ आले, अशी चर्चा आहे.