धुक्यामुळे रब्बी पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:23 PM2020-01-02T23:23:09+5:302020-01-02T23:23:38+5:30
नवीन वर्ष नवीन संकल्पना आणि नवीन आशा निर्माण करणारे असते मात्र नवीन वर्षाची सुरूवात बळीराजासाठी कधी दाट धुके तर कधी ढगाळ हवामान असे संकट घेऊन आले आहे.
कुकाणे : नवीन वर्ष नवीन संकल्पना आणि नवीन आशा निर्माण करणारे असते मात्र नवीन वर्षाची सुरूवात बळीराजासाठी कधी दाट धुके तर कधी ढगाळ हवामान असे संकट घेऊन आले आहे.
गेल्या दोन दिवसापासून पहाटेपासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके पडत असून सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा आदी पिकासह भाजीपाला पिकाचेही नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे पिके चांगल्या प्रकारे येतील अशी अपेक्षा करत असताना नेहमीप्रमाणे निसर्गाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाच्या संकटात मागील महिन्यातील अवकाळी पावसाने भर टाकली आहे. त्यानंतरच्या बळीराजा मात्र पुरता हवालदिल झाला आहे.
आठवड्यापासून थंडीचा जोर वाढल्याने रब्बीसाठी पोषण वातावरण तयार होत होते. पिके चांगली वाढून खरीप हंगामाची नुकसानभरपाई वसूल होईल अशी अपेक्षा होती.
नुकसानाची चाहूल घेऊन आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी निराश होत आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पिकांची वाढ थांबून उत्पादन घटण्याची भीती वर्तविली जात
आहे.