ढगाळ हवामानामुळे रब्बीची आशा धूसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:32 AM2021-01-13T04:32:54+5:302021-01-13T04:32:54+5:30
मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला ...
मागील खरीप हंगामातील ऐन पिके काढण्याच्या वेळी परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेत जमीन पिकांसह वाहून गेल्या होत्या. नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी कंबर कसली आहे. परतीच्या पावसामुळे आजही नद्यांना काही प्रमाणात पाणी आहे लहान-मोठी बंधारी पूर्णपणे भरलेली असल्याने शेतीच्या उपयोगासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव गेल्या हंगामातील नुकसानाची आर्थिक तूट भरून निघेल, या आशेने रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. लोकडाऊननंतर वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे साहजिकच लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याबरोबरच गहू, हरभरा, भुईमूग, काही ठिकाणी मका लागवड केली आहे. यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकांसाठी वातावरण पोषक राहिले नाही, त्यातच अचानकपणे थंडी, ढगाळ वातावरण, धुके, दवं, अधूनमधून बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. या साऱ्या खराब वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अभ्रच्छादित वातावरणामुळे पिकांवर मावा किडींचा प्रादुर्भाव झाला असून, अपुरा सूर्यप्रकशामुळे कोवळी पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांवर रोगराईचे सावट दिसून येत आहे. खरीपातील झालेल्या नुकसानीची जखम ताजी असताना अशा आसमानी संकटामुळे रब्बी हंगामही वाया जातो की काय, याचे संकेत मिळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.