दिंडोरी तालुक्यात रबीची पिके जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 06:08 PM2021-01-21T18:08:25+5:302021-01-21T18:08:44+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात व इतर भागात अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले; परंतु रबी हंगामातील गहू, हरभरा ही पिके अस्मानी संकटावर मात करीत जोमात आल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील हंगामाची नुकसान मालिका रबी हंगामातही सुरू राहिल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. आता अवकाळी पावसाने रबी हंगाम पूर्णपणे वाया जाईल की काय, या भीतीने शेतकरी वर्ग भयभीत झाला होता; परंतु नशिबाने साथ दिल्याने अवकाळी पावसाचा फटका केवळ अर्ली द्राक्षांना बसला व गहू, हरभरा ही पिके वाचल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
मागील हंगामात कमी पाऊस झाला; परंतु त्या कमी पावसामुळे नगदी भांडवल देणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला होता. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज उपलब्ध करून रबी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली; परंतु अवकाळी पाऊस, वातावरणाचे बदलते रूप, पाणीमिश्रित धुके यामुळे रबीतील पिके वाया जातात की काय, अशी शंका शेतकऱ्यांना वाटत होती. नंतर थोड्याच दिवसांनी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे ते वातावरण गहू, हरभरा पिकांसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे यंदा गहू व हरभरा याचे सरासरी उत्पादन वाढण्याचे चित्र सध्या दिसत आहे.