गारव्यामुळे रब्बीची पिके तरारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:22 PM2018-01-21T22:22:24+5:302018-01-22T00:25:35+5:30
गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
नायगाव : गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत
आहेत. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणात सध्या चांगल्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र नजरेस पडत आहे. आठवड्यापासून निर्माण झालेल्या गारव्यामुळे शेतातील रब्बीच्या सर्वच पिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. डिसेंबर महिन्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे गहू, कांदा, टमाटे, ज्वारी आदींसह विविध पिकांवर अनेक रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पिकांना रोगांपासून वाचवण्यासाठी शेतकºयांवर महागडी किटकनाशके फवारण्याची वेळ आली होती. सततच्या ढगाळ हवामानात अनेकदा फवारणी करूनही रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलत आहेत.
उत्पादन वाढीस मदत
गेल्या सहा-सात दिवसांपासून थंडीची चाहूल लागल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. थंडीचे आगमन होताच शेतातील सर्वच पिके तरारू लागली आहेत. या वाढत्या थंडीमुळे पिकांवरील मावा, तुडतुडे, चिकटा बिना फवारणीचा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. वाढलेली थंडी आणखी काही दिवस अशीच राहून वातावरणातील गारवा असाच टिकून राहिल्यास उत्पादन वाढीसही मदत होईल, असेही शेतकरी सांगत आहेत.